चार दिवस झाले तरी युक्रेन नमत नाहीय हे पाहून रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी अण्वस्त्रे तयार ठेवण्याची घोषणा केली आहे. यामुळे रशिया अण्वस्त्र हल्ला करण्याची शक्यता निर्माण झाली असून संयुक्त राष्ट्रांनी आपत्कालीन बैठक बोलावली आहे. त्यातच आता युक्रेनला एकाचवेळी दोन देशांच्या सैन्याशी लढावे लागणार आहे.
युक्रेनच्या सैन्याने रशियाच्या फौजांना गेल्या चार दिवसांपासून राजधानी कीवच्या हद्दीवर रोखून धरले आहे. कित्येक प्रयत्न झाले तरी रशियाच्या सैन्याला फार आतमध्ये शिरता आलेले नाही. यामुळे पुतीन संतापले आहेत. याचवेळी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेंस्की यांनी पुढील २४ तास खूप महत्वाचे असल्याचे म्हटले आहे. जी सात देशांनी रशियाला विरोध करण्याचे आश्वासन झेलेंस्की यांना दिले आहे. त्यातच आता युएन देखील सक्रीय झाली असून आपत्कालीन बैठक बोलविली आहे. काही महिन्यांपूर्वीच भेदभावाचा आरोप करून रशिया युएनमधून बाहेर पडला आहे.
रशियन सैन्याला कीव जिंकता येत नसल्याचे पाहून रशियाचा मित्र बेलारूसने मोठी तयारी केली आहे. बेलारुसही आता या युद्धात उतरणार आहे. युक्रेनमध्ये सैन्य पाठविणार असल्याचा दावा अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. सोमवारपासून बेलारूस त्यांचे सैन्य युक्रेनमध्ये रशियाच्या मदतीला पाठवणार आहे. या दोन्ही देशांनी युद्धाआधी मोठा सराव केला होता. यामुळे युक्रेनला आता दोन देशांच्या सैन्याशी लढावे लागणार आहे.
14 मुलांचा मृत्यूयुक्रेनने सोमवारी जारी केलेल्या निवेदनानुसार, गेल्या चार दिवसांत रशियन हल्ल्यात 352 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यात 14 मुलांचाही समावेश आहे.