पलटवार! यूक्रेनचा रशियावर सर्वात मोठा हल्ला; २० मृत्यू, १०० हून अधिक लोक जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2023 09:17 AM2023-12-31T09:17:12+5:302023-12-31T09:19:22+5:30
मिसाईलनं सेंट्रल कॅथेड्रल स्क्वायरवर एक स्केटिंग रिक, एक शॉपिंग सेंटर आणि रहिवासी इमारतींना लक्ष्य केले आहे.
रशिया आणि यूक्रेन यांच्यातील युद्धाने पुन्हा जोर पकडला आहे. अलीकडेच रशियाने यूक्रेनवर मोठ्या प्रमाणात बॉम्बहल्ले केले. त्याला प्रत्युत्तर देत यूक्रेनच्या बॉम्बहल्ल्यात २ मुलांसह २० लोकांचा मृत्यू झाला आहे. यू्क्रेनच्या उत्तरेकडील सीमेजवळील बेलगोरोदवर यूक्रेनकडून केलेल्या बॉम्बहल्ल्यात १११ लोक जखमी झालेत. यूक्रेननं या शहरावर केलेला आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला आहे असं रशियन अधिकाऱ्याने सांगितले.
कोमर्सेंट या दैनिकाने रशियाच्या तपास यंत्रणेच्या हवाल्यानं माहिती दिलीय की, यूक्रेनच्या खार्कीव परिसरात मल्टिपल रॉकेट लॉन्चरने डागण्यात आलेत. मिसाईलनं सेंट्रल कॅथेड्रल स्क्वायरवर एक स्केटिंग रिक, एक शॉपिंग सेंटर आणि रहिवासी इमारतींना लक्ष्य केले आहे. याआधी रशिया लष्कराने यूक्रेनवर १२२ मिसाईल हल्ले आणि ३६ ड्रोन हल्ले केले होते. यूक्रेनचे राष्ट्रपती झेलेंस्की यांनी रशियाच्या हल्ल्यात ३९ लोकांचा जीव गेला तर १५९ लोक जखमी झालेत असं म्हटलं आहे. या हल्ल्याने १२० शहरे आणि अनेक गावांना प्रभावित केले आहे. यूक्रेनी सैन्य दिर्घकाळापासून सीमेलगत असलेल्या रशियन भागात हल्ले करत आहे. परंतु हा हल्ला आतापर्यंतचा सर्वात मोठा आहे.
रशियाने एस ३०० मिसाईलने यूक्रेनच्या खार्कीववर हल्ला केला होता. ज्यात २ युवकांसह २१ लोक जखमी झाले होते. एक मिसाईल खार्कीव पॅलेस हॉटेल आणि दुसरी रहिवासी इमारतीवर पडली. हॉस्पिटल आणि नागरिकांना नुकसान पोहचवले जात आहे असं यूक्रेननं म्हटलं. तर यूक्रेननं रशियाच्या बेलगोरोद शहरावर केलेल्या हल्ल्याचा बदला आम्ही घेणारच. यूक्रेननं सोडलेल्या २ ओल्खा मिसाईलला रशियन रॉकेटनं उद्ध्वस्त केले त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान टाळता आले. मात्र यूक्रेननं रशियावर केलेल्या हल्ल्यात आर्थिक मालमत्ता, शॉपिंग सेंटर, दुकानांसह २२ रहिवासी इमारतींना नुकसान झाले आहे. १०० हून अधिक कार हल्ल्यात जळाल्या आहेत.
गेल्या काही महिन्यांत युक्रेनच्या सैन्याने क्रिमियाभोवती अनेक हल्ले केले आहेत. यात बहुतांश करून सागरी ड्रोनचा वापर करण्यात आला. रशियाने नियुक्त केलेले क्रिमियाचे प्रमुख सर्गेई अक्स्योनोव्ह यांनी या हल्ल्यात एक जण ठार झाल्याचे सांगितले. युक्रेनच्या वृत्तवाहिन्यांवर प्रसारित व्हिडीओंमध्ये बंदर परिसरात मोठी आग दिसून आली. एवढेच नाही तर युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी जहाज नष्ट झाल्याचा दावाही केला.