Russia Ukraine War: युक्रेनचा जोरदार प्रतिहल्ला, रशियावर केला एअरस्ट्राइक? मोठे नुकसान झाल्याचा रशियाने केला दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 02:10 PM2022-04-15T14:10:32+5:302022-04-15T14:11:19+5:30
Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेनमधील युद्ध आता अधिकच भयावह झाले आहे. त्यातच आता युक्रेनही रशियामध्ये घुसून हल्ला करण्याची रणनीती आखत आहे, असा दावा रशियाने केला आहे.
मॉस्को - रशिया आणि युक्रेनमधील युद्ध आता अधिकच भयावह झाले आहे. त्यातच आता युक्रेनही रशियामध्ये घुसून हल्ला करण्याची रणनीती आखत आहे, असा दावा रशियाने केला आहे. गुरुवारी रशियाने दावा केला की, युक्रेनी सैन्याची दोन हेलिकॉप्टर त्यांच्या सीमेमध्ये घुसली आणि त्यांनी नागरी वस्तीवर बॉम्बफेक केली. या हल्ल्यात अनेक नागरिक जखमी झाल्याचा दावा केला आहे. मात्र युक्रेनने असा कुठलाही हल्ला केल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे.रशियाने युक्रेनच्या सीमेच्या शेजारी असलेल्या बेलगोरोड आणि ब्रयान्स्कमध्ये हल्ला होण्याचा दावा केला आहे.
रशियाने बेलगोरोड आणि ब्रयान्स्क येथे हल्ला झाल्याचा दावा केला आहे. यापूर्वी युक्रेनने बेलगोरोडमध्ये रेल्वे ब्रिजवर हल्ला झाल्याचा दावा केला होता. बेलगोरोडचे महापौर व्याशेसलेव्ह ग्लादकोव्ह यांनी दावा केली की या हल्ल्यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही, तर केवळ रेल्वे ब्रिजला नुकसान झाले आहे. ज्या ब्रिजचे नुकसान झाले आहे, ते युक्रेनमधील डोनबास प्रांतापासून ६.५ किमी दूर अंतरावर आहे. रशियासाठी हा ब्रिज खूप महत्त्वाचा होता. कारण त्यावरून लष्करी सामुग्रीचा पुरवठा होत होता.
बेलगोरोडमध्ये युक्रेनकडून या महिन्यात झालेला दुसरा हल्ला आहे. यापूर्वी या महिन्याच्या सुरुवातील बेलगोरोडमधील तेल डेपोवर हल्ला केल्याचा आरोप युक्रेनवर केला होता. मात्र युक्रेनने हा दावा फेटाळला होता. रशियाने युक्रेनच्या सैन्यावर ब्रायान्स्कमधील एका गावावर एअरस्ट्राईक केल्याचा आरोप केला आहे. रशियाचा दावा आहे की, युक्रेनच्या दोन हेलिकॉप्टर्सनी ब्रायान्स्क आणि क्लिमोवोच्या गावातील रहिवासी भागांमध्ये एअरस्ट्राईक केली. ब्रायान्स्क हे युक्रेनच्या सीमेपासून ५५ किमी अंतरावर आहे.
रशियाच्या इन्व्हेस्टिगेटिव्ह कमिटीने एक पत्रक प्रसिद्ध करून दावा केला की, गुरुवारी युक्रेनच्या दोन लढाऊ हेलिकॉप्टर्सनी बेकायदेशीरपणे रशियाच्या एअरस्पेसमध्ये घुसून हल्ला केला. क्लिमोवेच्या गावातील इमारतींवर किमान ६ हवाई हल्ले केले. य हल्ल्यात सहा इमारतींचे नुकसान झाले असून, किमान ७ जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये एक दोन वर्षांचा मुलगा एक गर्भवती आणि वयस्करांचा समावेश आहे.
या हल्ल्यानंतर रशियाने युक्रेनला धमकी दिली आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, आमच्या हद्दीत युक्रेनी सैनिकांनी घुसखोरी करून मोडतोड आणि हल्ले केले. जर असेच चालू राहिले तर आम्ही युक्रेनच्या किव्ह कमांड सेंटरवर हल्ला करू. आतापर्यंत आम्ही हे टाळले होते. किव्हच्या याच कमांड सेंटरमधून युक्रेनचे सैन्य आपली रणनीती आखत असते.