Russia Ukraine War: युक्रेनच्या गनिमी काव्याने रशिया बेजार, ड्रोन हल्ले करून केली मोठी हानी, टँक, वाहने, विमाने, हेलिकॉप्टर्ससह मोठी जीवितहानी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2022 03:16 PM2022-03-01T15:16:21+5:302022-03-01T15:17:07+5:30
Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे. दोन्हीकडून एकमेकांविरोधात वेगवेगळे दावे केले जात आहेत. दरम्यान, युक्रेनवर आक्रमण करणाऱ्या रशियन सैन्याची मोठी हानी घडवून आणल्याचा दावा युक्रेनियन सैन्याने केला आहे.
किव्ह - रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे. दोन्हीकडून एकमेकांविरोधात वेगवेगळे दावे केले जात आहेत. दरम्यान, युक्रेनवर आक्रमण करणाऱ्या रशियन सैन्याची मोठी हानी घडवून आणल्याचा दावा युक्रेनियन सैन्याने केला आहे. दरम्यान, युक्रेनने केलेल्या दाव्यानुसार त्यांनी बायरक्तार टीबी२ ड्रोनच्या माध्यमातून रशियाचे १०० टँक आणि २० लष्करी वाहने नष्ट केली. दरम्यान, रशियाची काही विमाने, हेलिकॉप्टर्स आणि रॉकेट लाँचर्स नष्ट केल्याचा दावा युक्रेनने केला आहे. तसेच आतापर्यंत पाच हजारांहून अधिक रशियन सैनिक मारले गेलेत किंवा जखमी झाले आहे, असेही युक्रेनने म्हटले आहे.
दरम्यान, युक्रेनने उल्लेख केलेले बायरक्तार टीबी२ ड्रोन हे तुर्कीचे मीडियम एल्टिट्युट आणि लांब पल्ल्याचे उड्डाण करणारे मानवरहीत एरियल व्हेईकल आहे. ते रिमोट कंट्रोलच्या माध्यमातूनही संचालित करता येते. हे ड्रोन तुर्कीची कंपनी बायकार डिफेन्सने तयार केलेले आहे. या ड्रोनचा सर्वाधिक वापर तुर्कीचे सैन्यच करते. दरम्यान, तुर्की दोघांपैकी कुठल्याही देशाशी असलेले आपले संबंध बिघडू देणार नाही, असे तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांनी सांगितले.
संयुक्त राष्ट्रांनी दिलेल्या माहितीनुसार रशिया आणि युक्रेनमधील लढाईमुळे आतापर्यंत पाच लाखांहून अधिक लोकांनी युक्रेन सोडून शेजारील पोलंड, हंगेरी, रोमानिया, मोल्डोवा आणि स्लोव्हाकिया या देशांमध्ये आश्रय घेतला आहे. युक्रेनच्या शेजारील देशांच्या सीमेवर कार आणि बसच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत.