रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धात (Russia-Ukraine War) आतापर्यंत अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यामध्ये अनेक सामान्य लोकांपासून ते लष्कर आणि नामांकित लोकांचा समावेश आहे. दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धात युक्रेनची शार्प शूटर थालिता डो हिचा मृत्यू झाला आहे. युक्रेनच्या सैन्यात सामील झालेली ब्राझीलची मॉडेल थालिता डो रशियाच्या हवाई (Russian airstrike) हल्ल्यात ठार झाली आहे. थालिता डो हिच्या नातेवाईकांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या आठवड्यात थालिता डो हिच्या मृत्यूची माहिती मिळाली आहे.
थलिता डो हिचा मृत्यू गुदमरल्यामुळे झाल्याचे सांगण्यात येत आहे. 30 जून रोजी रशियाने खार्किवमध्ये रॉकेट हल्ला केला. रशियन बाजूने रॉकेट हल्ल्यामुळे बंकरला आग लागली. थालिता डो हिचा 40 वर्षांचा साथीदार डगलस बुर्गियो देखील या युद्धात लढत होता आणि त्यालाही या रॉकेट हल्ल्यात आपला जीव गमवावा लागला होता. त्याला बंकरमधून बाहेर काढण्यासाठी जात असताना बुर्गिओचा मृत्यू झाला.
दरम्यान, थालिता डो ही ब्राझीलची रहिवासी होती. मॉडेलिंगमध्ये करिअर केल्यानंतर तिने कायद्याचे शिक्षण घेतले होते. आयएसआयएस विरुद्ध मोर्चा काढण्यासाठी ती कुर्दीश सैन्यात सामील झाली. त्यावेळी थालिता डो एक ट्रेंड स्निपर बनली होती. तिचा मृत्यू होण्याच्या तीन आठवड्यांपूर्वी ती लढाईसाठी युक्रेनला पोहोचली होती आणि त्यानंतर तिला खार्किवला पाठवण्यात आले होते. तिचा भाऊ रॉड्रिगो व्हिएरियाने तिचा नायक म्हणून सन्मान केला आहे, जिने आपले जीवन इतरांना मदत करण्यासाठी समर्पित केले.
खार्किववर रशियाची नजर!खार्किव ( Kharkiv) हे युक्रेनचे दुसरे सर्वात मोठे शहर असून रशियाच्या ईशान्य सीमेजवळ आहे. हे शहर अजूनही कीवच्या ताब्यात असलेल्या एका पॉकेटमध्ये येते. रशियन सैन्य हे शहर युक्रेनपासून वेगळे करण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, संयुक्त राष्ट्रांच्या म्हणण्यानुसार, 13 एप्रिलपर्यंत युक्रेनमध्ये 1,932 लोक मारले गेले आहेत. रशिया-युक्रेन युद्धात आतापर्यंत 4,521 लोक जखमी झाले आहेत. यापैकी डोनेत्स्क आणि लुन्हास्कमध्ये 698 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर युक्रेनच्या ताब्यात असलेल्या भागात 621 लोकांचा मृत्यू झाला आहे.