रशिया आणि युक्रेनमधील युद्ध काही थांबण्याचे नाव घेत नाहीय. रशिया एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन हल्ले करू लागला आहे की, नागरिकांच्या घरांवरही मिसाईल, रॉकेट डागली जात आहेत. यामध्ये सामान्य नागरिकांचाही मृत्यू होत आहे. रशियन फौजांनी युक्रेनची राजधानी कीव्हवर शुक्रवारी रात्रभर बॉम्बफेक सुरु ठेवली होती. यामध्ये युक्रेनच्या प्रसिद्ध अभिनेत्री ओक्साना श्वेट्स (Oksana Shvets) यांचा मृत्यू झाला आहे. त्या ६७ वर्षांच्या होत्या.
रशियाने किव्हवर डागलेल्या रॉकेटमुळे त्यांचा मृत्यू झाला. ओक्साना यांच्या निधनाची माहिती Young Theatre Community ने दिली आहे. ओक्साना यांनी युक्रेनी रंगभूमीसाठी बरीच वर्षे काम केले. थिएटर कम्युनिटीने याची माहिती त्यांच्या फेसबुक पेजवर दिली आहे.
आपल्या भूमीवर असलेल्या शत्रूला माफी नाही, निवासी इमारतीवर रशियन रॉकेट हल्ल्यात ओक्साना श्वेट्सचा मृत्यू झाला आहे, असे या पोस्टमध्ये म्हटले आहे. ओक्साना श्वेट्स या युक्रेनमधील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. त्यांचा अभिनय लोकांना खूप आवडायचा. इतकंच नाही तर त्यांना युक्रेनचा कला क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते.
ओक्साना श्वेट्सपूर्वी, प्रसिद्ध युक्रेनियन चित्रपट दिग्दर्शक आणि पत्रकार ब्रेंट रेनॉड यांचा मृत्यू झाला होता. युक्रेनमधील इरपिन शहरावर रशियन सैन्याने केलेल्या गोळीबारात ब्रेंटची कार आल्याचे सांगण्यात आले. एएफपीच्या वृत्तानुसार, या हल्ल्यात ब्रेंटचा मृत्यू झाला. त्याच्यासोबतचा आणखी एक पत्रकार जुआन अरेडोंडो याला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. हे दोघेही युक्रेनच्या निर्वासितांचा अहवाल तयार करत होते.