सध्या जगभरात रशिया-यूक्रेन युद्धाची बरीच चर्चा आहे. रशियानं यूक्रेनवर हल्ला केल्यापासून आतापर्यंत आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या हालचाली पाहायला मिळाल्या आहेत. गेल्या सहा दिवसांपासून रशिया-यूक्रेन युद्ध सुरू आहे. युद्धाची घोषणा करणाऱ्या रशियावर जगभरातून टीका होत आहे. नाटो (NATO) सह अन्य प्रमुख संघटना या युद्धासाठी रशियाला जबाबदार धरत आहेत. याच दरम्यान अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. अशाच एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत असून यामध्ये युक्रेनच्या एका शेतकऱ्याने ट्रॅक्टरला रशियाचा रणगाडा बांधल्याचं पाहायला मिळत आहे.
युक्रेनमधील एक शेतकरी रशियाला न घाबरता त्यांचा रणगाडाच आपल्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने पळवून नेत आहे. ऑस्ट्रियातील युक्रेनचे राजदूत ऑलेक्झांडर शेरबा (Olexander Scherba) यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. युक्रेनचा हा शेतकरी रस्त्यावर ट्रॅक्टरला रणगाडा बांधून ओढत असल्याचं व्हिडीओतून दिसून येतं आहे. तर एक व्यक्ती रणगाड्यामागे धावताना दिसत आहे. 'हे जर खरं असेल तर शेतकऱ्याने पळवलेला हा पहिला रणगाडा असेल' असं या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये देखील त्यांनी म्हटलं आहे.
एका रणगाड्याला दोरी बांधून एक शेतकरी तो टोईंग केल्याप्रमाणे आपल्या ट्रॅक्टरने खेचत घेऊन चालल्याचा हा व्हिडीओ अनेकांनी शेअर केला आहे. ब्रिटीश खासदार जॉनी मेर्कर यांचाही यामध्ये समावेश आहे. "मी काही तज्ज्ञ नाही पण रशियाने केलेलं हे आक्रमण फारसं प्रभावी ठरताना दिसत नाही. आज एका युक्रेनियन ट्रॅक्टरने रशियाचा रणगाडा चोरुन नेला" अशा कॅप्शनसहीत ब्रिटीश खासदाराने हा व्हिडीओ शेअर केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. युक्रेनवर हल्ला करण्यासाठी निघालेल्या रशियन सैनिकाच्या एका घोडचुकीमुळे ते यूक्रेनच्या हाती लागलेत. आता हे दोन्ही सैन्य जवानांना यूक्रेननं कैद केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोघंही रशियातून यूक्रेनवर हल्ला करण्यासाठी निघाले होते. परंतु त्यांनी गाडीतील पेट्रोल चेक केले नाही.
अर्ध्या रस्त्यातच त्यांच्या गाडीतील इंधन संपुष्टात आले. त्यामुळे ते यूक्रेन सैन्याच्या हाती लागले. या दोघांना बंदी बनवून जेलमध्ये टाकलं आहे. परंतु अद्याप हे स्पष्ट नाही की दोघं टँक चालवत होते की, अन्य लढाऊ वाहन? मात्र यूक्रेनच्या सीमेत प्रवेश केल्यानंतर त्यांच्या गाडीचं पेट्रोल संपलं. त्यानंतर ते स्थानिक पोलिसांकडे मदतीला गेले. युक्रेनची राजधानी कीवच्या इंडिपेंडेंट न्यूज आऊलेटनं दोघांचे फोटो शेअर केलेत. त्यात दोघांच्या हातात बेड्या दिसत आहेत. या दोन रशियन जवानांना अटक करण्यात आली आहे. ना प्रिजनर ऑफ वॉर घोषित केले आहे.