कीव: महिन्याभरापासून रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे. रशियाच्या हल्ल्यात अनेक युक्रेनियन नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले, तर जिवंत असलेले नागरिक आपला जीव मुठीत धरुन बसले आहेत. दरम्यान, आपला मृत्यू झाल्यास मुलांची ओळख पटावी आणि कुणीतरी त्यांचा सांभाळ करावा, या उद्देशाने अनेक पालक मुलांच्या अंगावर कुटुंबाची माहिती लिहीत आहेत.
...आणि युरोप अजूनही गॅसवर चर्चा करत आहे
युक्रेनियन पत्रकार अनास्तासिया लॅपॅटिना हिने ट्विटरवर हा फोटो शेअर केला आहे. या फोटोसह तिने लिहीले की,'युद्धात मृत्यू झाल्यास कुटुंबाची माहिती मिळावी म्हणून आई आपल्या मुलांच्या शरीरावर माहिती लिहीत आहेत आणि तिकडे युरोप अजूनही गॅसवर चर्चा करत आहे.' या व्हायरल फोटोमध्ये एका छोट्या युक्रेनियन मुलीच्या पाठीवर तिचे नाव आणि टेलिफोन नंबर लिहिलेला दिसतोय. मुलीचा हा फोटो तिची आई साशा माकोवीने तीन दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता.
रशियन सैन्याकडून मुलांचा वापरफोटोवर प्रतिक्रिया देताना एका ट्विटर युजरने लिहिले की, "हे हृदयद्रावक आहे, माझ्याकडे शब्द नाहीत." रशिया आणि युक्रेनमधील युद्धाला एक महिन्याहून अधिक काळ लोटला आहे. यादरम्यान, युद्धाची अनेक भयावह चित्रे समोर आली आहेत. गेल्या आठवड्यातच, द गार्डियनने वृत्त दिले होते की, रशियन सैन्य पळून जाण्यासाठी मुलांचा वापर "मानवी ढाल" म्हणून करत आहे. अहवालात असे म्हटले आहे की, मुलांनी भरलेल्या बसेस चेर्निहाइव्हपासून लांब असलेल्या नोव्ही बायकीव्ह गावात उभ्या आहेत.
कीवमध्ये सामूहिक कबरी सापडल्यात्यानंतर, युक्रेनची राजधानी कीवच्या बाहेर बुचामध्ये सामूहिक कबरी असल्याच्या बातम्या आल्या, ज्यामध्ये हात पाय बांधलेले मृतदेह सापडले. यानंतर रशियावर जागतिक पातळीवर जोरदार टीका झाली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर युद्ध गुन्ह्यांचा आरोप केला आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी या हत्येला नरसंहार म्हटले.