किव्ह - युक्रेन आणि रशिया यांच्यात सुरू असलेल्या भीषण संघर्षाच्या भयावह वार्ता क्षणाक्षणाला येत आहेत. रशियाच्या हल्ल्यात भाजून निघत असलेल्या खारकिव्ह, किव्ह शहरांमध्ये झालेल्या विध्वंसाची छायाचित्रे समोर येत आहेत. दरम्यान, रशियाकडून होत असलेले हल्ले आणि गोळीबारामध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेकजण जखमी झाले आहेत. यादरम्यान, या भीषण गोळीबारात एका लहान मुलाचे प्राण त्याच्या खिशात असलेल्या पासपोर्टमुळे वाचल्याची आश्चर्यकारक घटना समोर आली आहे.
याबाबत समोर आलेल्या वृत्तानुसार एका १६ वर्षांच्या मुलाने त्याच्या खिशात युक्रेनचा पासपोर्ट ठेवला होता. दरम्यान, मारियोपोलमध्ये जेव्हा रशियाकडून गोळीबारी करण्यात आली तेव्हा यामध्ये हा मुलगाही जखमी झाला. मात्र दिलासादायक बाब म्हणजे हा पासपोर्ट खिशात राहिल्यामुळे गोळी थेट मुलाच्या छातीमध्ये घुसली नाही आणि त्याचे प्राण वाचले.
गोळी पासपोर्टला भेदून गेली. मात्र तोपर्यंत तिची तीव्रता कमी झाली होती. त्यामुळे मुलाला किरकोळ जखम झाली. सध्या या मुलावर रुग्णालयात उपचार केले जात आहेत. समोर आलेल्या फोटोंमध्ये गोळीचा तुकडा पासपोर्टमध्ये अडकलेला दिसत आहे. जर गोळी थेट मुलाला लागली असती तर त्याचा मृत्यू झाला असता.
युक्रेन आणि रशियातील संघर्ष आज सातव्या दिवशी अधिकच तीव्र झाला असून, रशियाने युक्रेनमधील प्रमुख शहर असलेल्या खारकिव्हमधील अनेक महत्त्वाच्या इमारतींना लक्ष्य केले आहे. तसेच किव्हच्या दिशेनेही रशियन सैन्याची आगेकूच सुरू आहे. कुठल्याही क्षणी रशियाकडून किव्हवर निर्णायक हल्ला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.