Russia Ukraine War: युक्रेनचे सैन्य पोलंडमध्ये, नाटोच्या फौजा सीमेवर धडकल्या; रशियाविरोधात काय घडतेय...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 03:30 PM2022-03-30T15:30:12+5:302022-03-30T15:30:35+5:30
US Javelin Missiles To Ukraine: रशियाविरोधात थेट युद्धात उडी घेता येत नसली तरी अमेरिकेने मोठी ताकद युक्रेनच्या बाजुने उभी केली आहे. रशियाकडून अणुबॉम्ब हल्ल्याचा धोका वाढलेला असताना या हालचाली सुरु झाल्या आहेत.
रशियाकडून अणुबॉम्ब हल्ल्याचा धोका वाढलेला असताना युक्रेनच्या सीमेवर मोठी घडामोड घडत आहे. नाटोच्या फौजांनी युक्रेन-पोलंडच्या सीमेवर ताबा घेतला असून रशियाविरोधात मोठे पाऊल उचलले जात आहे. अमेरिकेचे सैन्य युक्रेनच्या सैनिकांना त्यांची खतरनाक शस्त्रे वापरण्याचे प्रशिक्षण देत आहेत.
अमेरिकेने नाटोच्या सैन्याला युरोप आणि पोलंडच्या सुरक्षेसाठी सीमेवर तैनात केले आहे. बायडेन यांच्या पोलंड दौऱ्यानंतर हे प्रमाण वाढविण्यात आले आहे. रशियाविरोधात थेट युद्धात उडी घेता येत नसली तरी अमेरिकेने मोठी ताकद युक्रेनच्या बाजुने उभी केली आहे. अमेरिकेची सर्वात घातक शस्त्रे कशी वापरायची याचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. युक्रेनचे हजारोंच्या संख्येने सैन्य पोलंडमध्ये दाखल झाले आहे. तिथे ते हे प्रशिक्षण घेत आहेत.
सीएनएनुसार अमेरिका युक्रेनला मोठ्या प्रमाणावर जेवलिन अँटी टँक मिसाईल देत आहे. हे शस्त्र एवढे खतरनाक आहे की रशियन फौजांचे कंबरडेच मोडले आहे. पोलंडमधून ही शस्त्रे युक्रेनला पोहोच करण्यात येत आहेत. अमेरिका युक्रेनला ९ हजार जेवलिन आणि सात प्रकारची छोटी शस्त्रास्त्रे देणार आहे. यामध्ये मशीनगन देखील आहे. याचबरोबर युक्रेनला दोन कोटी बंदुकीच्या गोळ्या देण्यात आल्या आहेत.
ही शस्त्रे अमरिकेने थेट युक्रेन सैन्याच्या हाती सोपविली आहेत. युक्रेनच्या हाती आता कमी वेळ उरला आहे. रशिया एकीकडे शांतता चर्चा सुरु ठेवून मिसाईल हल्ले करत आहे. दुसरीकडे केव्हाही अणुबॉम्बचा वापर केला जाण्याची शक्यता आहे. रशियात तशा संशयास्पद हालचाली घडू लागल्या आहेत. तशीच वेळ आली तर काय करायचे याची तयारी अमेरिकेने सुरु केली आहे. अमेरिकेनेही टायगर फोर्सला हाय अलर्टवर टाकले आहे. तिसऱ्या महायुद्धाची वेळ येऊ नये यासाठी जगभरातील लाखो लोक प्रार्थना करत आहेत.