कीव: रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध पेटलं आहे. बलाढ्य रशियासमोर युक्रेनची वाताहत होत आहे. कालपासून सुरू झालेल्या युद्धामुळे युक्रेनचं मोठं नुकसान झालं आहे. अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांनी इशारे देऊन, निर्बंध लादूनही रशिया युद्ध थांबवण्यास तयार नाही. त्यात अमेरिकेसह इतर राष्ट्रांनी रशियाचा निषेध केला असला तरीही युक्रेनच्या मदतीसाठी कोणीही सैन्य पाठवलेलं नाही. त्यामुळे युक्रेन एकाकी पडला आहे. नागरिकांनी सैन्यात भरती व्हावं आणि देशासाठी लढावं, असं आवाहन युक्रेन सरकारकडून करण्यात आलं आहे.
रशियाचे हल्ले सुरू असताना युक्रेनमध्ये आंदोलनं सुरू झाली आहेत. रशियाच्या निषेधार्थ जनता रस्त्यावर उतरली आहे. सध्या सोशल मीडियावर एका युक्रेनी महिलेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये दिसणारी महिला एका रशियन सैनिकाला चांगलंच सुनावताना दिसत आहे. हातात बंदूक घेऊन उभ्या असलेल्या सैनिकाला सुनावणाऱ्या महिलेचं सध्या सर्वांकडून कौतुक होत आहे.
व्हिडीओमध्ये महिला सैनिकाला कोण आहात, कुठून आलात असे प्रश्न विचारताना दिसते. आम्ही इथे लष्करी सरावासाठी आली असल्याचं तो सैनिक सांगतो. तो तिला जाण्यासाठी मार्गही दाखवतो. बंदुकधारी सैनिक रशियन असल्याचं यादरम्यान महिलेला समजतं. त्यानंतर ती त्याला उद्देशून आक्षेपार्ह भाषा वापरते.
बंदुकधारी सैनिक महिलेला शांत करण्याचा प्रयत्न करतो. आपल्या या चर्चेतून काहीच साध्य होणार नाही, असं सैनिक सांगून पाहतो. मात्र महिला तरीही त्याच्या कृत्याचा, रशियाच्या कारवाईचा निषेध करते. तिथे उपस्थित असलेल्या काहींनी हा व्हिडीओ चित्रित केला. बंदुकधारी सैनिकासमोर स्वत:ची बाजू निर्भीडपणे मांडणाऱ्या या धाडसी महिलेचं सध्या सगळेच कौतुक करत आहेत.