वॉश्गिंटन – गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेल्या रशिया-यूक्रेन संघर्षाचं रुपांतर गुरुवारी युद्धामध्ये झालं. रशियानं यूक्रेनविरोधात युद्धाची घोषणा करत मिसाइल हल्ले केले. या दोन्ही देशाच्या युद्धात पहिल्याच दिवशी १३७ जणांचा मृत्यू झाला. रशियानं यूक्रेनची राजधानी कीवला चहूबाजूने घेरलं आहे. अनेक शहरात स्फोट घडवले आहेत. या युद्धाचे परिणाम जागतिक पातळीवर उमटू लागलेत.
यूक्रेनवर झालेल्या हल्ल्याचा अमेरिकेचे(America) राष्ट्रपती ज्यो बायडन(Joe Biden) यांनी रशियाचा निषेध केला आहे. बायडन म्हणाले की, रशिया यूक्रेनवर हल्ला करणार याबाबत आधीपासून अंदाज होता. पुतिन हल्लेखोर आहे. त्यांनी युद्धाचा पर्याय निवडला. परंतु पुतिन आणि रशियाला या हल्ल्याचे परिणाम भोगावे लागणार आहेत. जगातील बहुतांश देश रशियाच्या विरोधात गेले आहेत. आम्ही रशियावर आणखी कडक निर्बंध लागू करू असा इशारा त्यांनी दिला.
तसेच यूक्रेन-रशियाच्या युद्धाचा परिणाम अमेरिकेवरही पडू शकतो. यूक्रेनमध्ये अडकलेल्या अमेरिकन नागरिकांची सुरक्षा आमच्यासाठी प्राधान्य आहे. आम्ही सायबर हल्ल्याला उत्तर देण्यासाठी तयार आहोत. मात्र यूक्रेनमध्ये सध्या अमेरिकेचे सैन्य पाठवणार नाही. नाटो देशांच्या इंचभर जमिनीचं आम्ही रक्षण करू. आगामी काळात रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्याशी बोलण्याचा काही संबंध नाही असंही ज्यो बायडन यांनी स्पष्ट सांगितले.
हा हल्ला पूर्वनियोजित – अमेरिका
रशियन सैन्याने यूक्रेनवर हल्ला सुरु केला. हा पूर्वनियोजित हल्ला असून याचं प्लॅनिंग गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु होतं. आम्ही जी-७ देश मिळून रशियाला उत्तर देऊ. VTB सह रशियाच्या ४ आणखी बँकांवर निर्बंध लावले आहेत. रशियाची महत्त्वाकांक्षा खूप वेगळी आहे. आज आम्ही ज्या जागेवर आहोत तिथं रशियाला पोहचायचं आहे असंही ज्यो बायडन यांनी म्हटलं आहे.
ब्रिटननेही रशियावर लावले निर्बंध
रशियाने यूक्रेनवर हल्ला केला परंतु त्याला मोठी आर्थिक किंमत चुकवावी लागेल अशा शब्दात ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी युद्धावर भाष्य केले आहे. ते म्हणाले की, ब्रिटनला रशियाच्या विरोधात हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सादर करण्यात आलेल्या आर्थिक निर्बंधांत रशियाच्या मालकीची बँक VTB ची संपूर्ण मालमत्ता गोठवण्याचे अधिकार आहेत. 'सर्वात मोठ्या आणि सर्वात कठोर पॅकेज'मध्ये रशियन बँकांना देशाच्या आर्थिक व्यवस्थेतून बाहेर काढण्याची परवानगी देणे समाविष्ट आहे.