कीव्ह-
युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये ९०० मृतदेह असलेली आणखी एक सामूहिक कबर सापडली आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी याबाबतची माहिती दिली आहे. शुक्रवारी पोलंडमधील मीडियाला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्राध्यक्ष म्हणाले की ज्या भागात मृतदेह सापडले तो भाग मार्चमध्ये रशियन सैन्यानं ताब्यात घेतला होता. असं वृत्त ऑनलाइन न्यूज पोर्टल युक्रेन्स्का प्रवदाने दिले आहे. "किती लोक मारले गेले हे कोणालाच माहीत नाही", असंही झेलेन्सी म्हणाले आहेत.
झेलेन्स्की यांनी याप्रकरणाची चौकशी केली जाईल. त्यानंतर गणना देखील होईल. ही सगळी माणसं शोधायची आहेत पण ते किती लोक आहेत हेही कळत नाही, असंही ते म्हणाले. २४ फेब्रुवारीला लढाई सुरू झाल्यापासून सुमारे पाच लाख युक्रेनियन लोकांना बेकायदेशीरपणे रशियाला पाठवण्यात आल्याचा दावाही झेलेन्स्की यांनी केला आहे. "युक्रेनियन अभियोक्ता आणि कायद्याची अंमलबजावणी करणारे अधिकारी युक्रेनच्या नागरिकांविरुद्ध केलेल्या गुन्ह्यांशी संबंधित असलेल्या सर्व रशियन सैनिकांना शोधून त्यांच्यावर खटला चालवतील", असंही झेलेन्स्की म्हणाले.
10 रशियन सैनिकांनी युक्रेनियन लोकांचा छळ करून त्यांना ठार मारलेदरम्यान, युक्रेननं बुचा येथे युक्रेनियन लोकांचा छळ करून त्यांना ठार करणार्या १० रशियन सैनिकांची ओळख पटवली आहे, असे ऑनलाइन न्यूज पोर्टल युक्रेन्स्कानं वृत्त प्रसिद्ध केले आहे. बुचाचे महापौर अनातोली फेडोरुक यांनी २३ एप्रिल रोजी घोषणा केली की रशियन सैन्याने मारलेले ४१२ नागरिक कीव्ह शहरापासून ३१ किमी अंतरावर सामूहिक कबरींमध्ये सापडले आहेत. कीव्ह प्रदेशातील सामूहिक कबरींमध्ये तपासकर्त्यांना आतापर्यंत सुमारे १,१०० मृतदेह सापडले आहेत.
मारियुपोलच्या बाहेरील प्रदेशात ३ सामूहिक कबरीमारियुपोल शहराच्या बाहेर तीन सामूहिक कबरी देखील सापडल्या आहेत, ज्यात हजारो नागरिकांचे मृतदेह आहेत. यापूर्वी असे वृत्त आले होते की पुतिन यांनी सुमारे ५ लाख युक्रेनियन नागरिकांना रशियाच्या दुर्गम भागात कैद केले आहे. पुतिन यांना युद्धग्रस्त देशावर आपले नियंत्रण मजबूत करायचे आहे, हे यातून दिसून येते. युक्रेनचे युनायटेड नेशन्सचे स्थायी प्रतिनिधी सेर्गी किस्लियस यांच्या म्हणण्यानुसार, १ लाख २१ हजार मुलांसह ५ लाख युक्रेनियन लोकांना "जबरदस्तीने" रशियाला पाठवण्यात आले आहे.