Russia-Ukraine War: हल्ल्यापासून रक्षणासाठी यूक्रेन करतंय भारतीय विद्यार्थ्यांचा मानवी ढाल म्हणून वापर; रशियाचा खळबळजनक दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2022 08:18 AM2022-03-03T08:18:02+5:302022-03-03T08:18:31+5:30
Russia-Ukraine War: बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात झालेल्या चर्चेदरम्यान भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यास रशिया मदत करत असल्याचा दावा त्यांनी केला.
Russia-Ukraine War: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी बुधवारी रात्री रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Russia Vladimir Putin) यांच्याशी चर्चा केली. पंतप्रधान मोदी आणि पुतिन यांच्यात झालेल्या चर्चेनंतर रशियाच्या संरक्षण मंत्रालयाकडून एक निवेदन जारी करण्यात आलं.
'आमचं लष्कर कीव आणि खारकीवमधून भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यास पूर्णपणे मदत करत आहे. परंतु युक्रेननं भारतीय विद्यार्थ्यांना ओलीस ठेवलं आहे,' असं रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. तसंच भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेन मानवी ढाल बनवत आहे आणि भारतीय विद्यार्थ्यांना रोखलं जात आहे, असा खळबळजनक दावा रशियानं केला आहे. खारकीवमधूनही भारतीयांना बाहेर काढण्याचे प्रयत्न केले जात असल्याचं रशियानं म्हटलं आहे.
In fact, they are being held as hostages & offered to leave the territory of Ukraine via Ukrainian-Polish border. They offered to go through the territory where active hostilities are taking place. https://t.co/ogkgjPZtpQ
— Russia in India 🇷🇺 (@RusEmbIndia) March 2, 2022
युक्रेनकडूनही मोठं वक्तव्य
याचदरम्यान युक्रेनकडून मोठं वक्तव्य समोर आलं आहे. आपल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी एक कॉरिडोअर तयार करण्यासाठी रशियासोबतच चर्चा करं असं युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयानं ट्वीट करत भारत आणि अन्य देशांना आवाहन केलं आहे. रशियाच्या हल्ल्यामुळे खारकीव, सुमीसह अन्य शहरात आपल्याला अडकलेल्य़ा विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी मानवी कॉरिडोअर बनवण्यास रशियाची चर्चा करा असं युक्रेननं भारत, पाकिस्तान आणि चीनला सांगितलं.
जे भारतीय विद्यार्थी अडकले आहेत त्यांना युक्रेनमधून सुरक्षित बाहेर काढण्यासाठी मदत केली जावी, अशी मागणी भारतानं रशियाकडे केली होती. तर दुसरीकडे यादरम्यान रशियानंच युक्रेनवर गंभीर आरोप केले. जे रणगाडे रोखले जात आहेत, त्यात भारतीय विद्यार्थ्यांचा मानवी ढाल म्हणून वापर केला जात असल्याचं त्यांनी सांगितलं.
तर दुसरीकडे पोलंडमध्ये बॉर्डर गार्ड्सनं १०० भारतीय विद्यार्थ्यांना मारहाण केली आणि त्यांना पुन्हा युक्रेनच्या दिशेने पाठवलं असल्याचा दावा बेलारुसच्या राजदूतांना युएनमध्ये केला. युक्रेनमधून आतापर्यंत १७ हजारांपेक्षा अधिक भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षित आणल्याचा दावा भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं केलाय.