Russia-Ukraine War: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी बुधवारी रात्री रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Russia Vladimir Putin) यांच्याशी चर्चा केली. पंतप्रधान मोदी आणि पुतिन यांच्यात झालेल्या चर्चेनंतर रशियाच्या संरक्षण मंत्रालयाकडून एक निवेदन जारी करण्यात आलं.
'आमचं लष्कर कीव आणि खारकीवमधून भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यास पूर्णपणे मदत करत आहे. परंतु युक्रेननं भारतीय विद्यार्थ्यांना ओलीस ठेवलं आहे,' असं रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. तसंच भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेन मानवी ढाल बनवत आहे आणि भारतीय विद्यार्थ्यांना रोखलं जात आहे, असा खळबळजनक दावा रशियानं केला आहे. खारकीवमधूनही भारतीयांना बाहेर काढण्याचे प्रयत्न केले जात असल्याचं रशियानं म्हटलं आहे.
जे भारतीय विद्यार्थी अडकले आहेत त्यांना युक्रेनमधून सुरक्षित बाहेर काढण्यासाठी मदत केली जावी, अशी मागणी भारतानं रशियाकडे केली होती. तर दुसरीकडे यादरम्यान रशियानंच युक्रेनवर गंभीर आरोप केले. जे रणगाडे रोखले जात आहेत, त्यात भारतीय विद्यार्थ्यांचा मानवी ढाल म्हणून वापर केला जात असल्याचं त्यांनी सांगितलं.
तर दुसरीकडे पोलंडमध्ये बॉर्डर गार्ड्सनं १०० भारतीय विद्यार्थ्यांना मारहाण केली आणि त्यांना पुन्हा युक्रेनच्या दिशेने पाठवलं असल्याचा दावा बेलारुसच्या राजदूतांना युएनमध्ये केला. युक्रेनमधून आतापर्यंत १७ हजारांपेक्षा अधिक भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षित आणल्याचा दावा भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं केलाय.