कीव – गेल्या गुरुवारी रशियानं यूक्रेनविरोधात युद्ध पुकारलं. मागील ६ दिवसांपासून रशियानं यूक्रेनच्या अनेक शहरांवर बॉम्बहल्ले सुरूच ठेवले आहेत. कुठल्याही परिस्थिती यूक्रेनला धडा शिकवायचा असा इरादा रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांनी केला आहे. रशियाच्या हल्ल्याविरोधात जगभरात निषेध केला जात आहे. त्याचसोबत यूक्रेनकडून रशियाला होत असलेल्या प्रतिकाराचं कौतुकही केले जात आहे.
युद्धाच्या सहाव्या दिवशी रशियानं यूक्रेनच्या खारकीव शहरावर बॉम्बहल्ले, गोळीबार सुरू केला. रशियाच्या हल्ल्यातील यूक्रेनचे अनेक शहरं आली आहेत. त्याचवेळी अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्याने मंगळवारी दावा केला की, यूक्रेनची राजधानी कीवच्या दिशेने जाणाऱ्या रशियन सैन्याची हालचाल ठप्प झाली आहे. रशियन सैन्याला जेवणासह इतर अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं कारण अधिकाऱ्याने दिलं आहे.
अधिकारी म्हणाले की, कीवच्या दिशेने जात असलेले सैन्य मंगळवारीही जैसे थे आहे. रशियन सैन्याला इंधनासह इतर साहित्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्याचसोबत जेवणाची कमतरता भासत आहे. इतकचं नाही तर यूक्रेनी नागरिकही मोठ्या प्रमाणात देशाच्या रक्षणासाठी उतरला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी रशियाच्या सैन्याला विरोधाचा सामना करावा लागत असल्याने कीवच्या दिशेने जाताना अडथळा निर्माण झाला आहे.
रशिया रणनीतीत बदल करण्याची शक्यता
अमेरिकन अधिकाऱ्याने दावा केला की, रशिया पुनर्विचार करून त्यांच्या रणनीतीत बदल करण्याची शक्यता आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने उघडपणे ते कीवमधील रहिवासी भागालाही टार्गेट करणार असल्याचं सांगितले आहे. रशियानं यूक्रेनमध्ये जवळपास ८० टक्के ताकद पणाला लावली आहे. रशियाने आतापर्यंत यूक्रेनच्या विविध ठिकाणी ४०० हून अधिक मिसाईल हल्ले केले आहेत. रशियन सैन्यातील जवानही संकटापासून वाचण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अनेक ठिकाणी रशियन सैन्य विनालढाई आत्मसमर्पण करत असल्याचं दिसून येत आहे. अनेकांना यूक्रेनवर हल्ला करण्यासाठी का गेलोय हेदेखील माहिती नसल्याचा दावा करण्यात आला आहे.
संरक्षण मंत्रालयातील ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, रशियाकडे बलाढ्य सशस्त्र दल असूनही यूक्रेनच्या हवाई क्षेत्रात कब्जा मिळवण्यात रशियाला यश आलं नाही. युद्धाच्या पहिल्यादिवशी प्रमाणे रशियन सैन्याला दक्षिण यूक्रेनमध्ये अधिक यश आलं. सध्या रशिया कीव आणि खारकीवसारख्या मोठ्या शहरांवर हल्ला करण्याचं टार्गेट निश्चित केले आहे.