वॉश्गिंटन – मागील २८ दिवसांपासून रशिया यूक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे. परंतु यूक्रेनमध्ये अपेक्षेप्रमाणे यश मिळत नसल्यानं रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन(Vladimir Putin) चांगलेच वैतागले आहेत. त्यामुळे आगामी काळात पुतिन अणुहल्ल्याचा धोका पत्करू शकतात असं म्हटलं जात आहे. रशियानं युद्धाची घोषणा केली तेव्हाही अणुहल्ला करण्याची धमकी इतर देशांना दिली. त्यावर अमेरिकेसह नाटो देशांनी सावध पवित्रा घेतला. मात्र यूक्रेनसोबत विजय न मिळाल्याने पुतिन हे घातक पाऊल उचलण्याची शक्यता आहे. त्यामुळे अमेरिकेने(America Tiger Team) ‘टायगर टीम’ला अलर्ट राहण्याचे आदेश दिलेत.
ज्यो बायडन(Joe Biden) प्रशासनाने या टीमला विशेष जबाबदारी दिली आहे. जर पुतिन यांनी रासायनिक, जैविक किंवा अणुहल्ला केल्यास त्यावर यूएसला काय उत्तर द्यावे याचा आढावा घेण्याचं काम सोपवलं आहे. युद्धाच्या ४ दिवसानंतर ही टीम बनवण्यात आल्याचं पुढे आले आहे. न्यूयॉर्क टाइम्सनुसार, टायगर टीममध्ये राष्ट्रीय सुरक्षा अधिकारी सहभागी आहेत. या टीमला अलर्ट देणे म्हणजे यूक्रेनसोबतच्या युद्धात रशिया अणुहल्ला करण्यासही मागे हटणार नाही हा आहे. टायगर टीमची स्थापना २८ फेब्रुवारीला रशियानं यूक्रेनवर हल्ला केल्याच्या चौथ्या दिवशी करण्यात आली. तेव्हापासून या टीमचे सदस्य आठवड्यातून तीन वेळा बैठक घेतात.
टायगर टीमचं ‘या’ मुद्द्यांवर लक्ष
यूक्रेनसोबत युद्धासोबतच रशिया मोल्दोवा आणि जॉर्जियासह शेजारील देशात युद्धाचा विस्तार करू शकतं यावर टीमचं बारकाईने लक्ष आहे. जर असे झाले तर युरोपीय देश शरणार्थींच्या समस्या सोडवण्यासाठी कसे तयार आहे. ज्यारितीने पुतिन वारंवार अणुहल्ल्याची धमकी देत आहेत. टायगर टीमचं काम आणि टेन्शन सर्वात जास्त वाढलं आहे. अलीकडेच रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांनी पुन्हा एकदा अणुहल्ल्याची धमकी दिली होती.
पुतिन यांच्यासमोर ४ पर्याय
तर यूएस सिनेटर एंगस किंग यांच्यानुसार, आता युद्धात पुतिन यांच्यासमोर ४ पर्याय आहेत. पहिलं म्हणजे राजकीय तडजोड करत युद्ध संपवण्याचा प्रयत्न करणे, दुसरं यूक्रेनच्या शहरांवर हल्ला आणि बॉम्बस्फोट आणखी तीव्र करणे. तिसरं पाश्चात्य देशांवर सायबर हल्ला आणि अखेर दबाव कमी करण्यासाठी जगाला धमकावत अणुहल्ल्याची वापर करणे. रशिया-यूक्रेन युद्धाला आता १ महिना होत आला परंतु रशियन सैन्याला यूक्रेनला नमवता आले नाही. त्यामुळे बलाढ्य रशियाची नाचक्की होत असल्याचं दिसून येत आहे.