किव्ह - युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेले युद्ध भयानक पातळीवर पोहोचले आहे. दरम्यान, या युद्धातील काही सुरस कहाण्या समोर आल्या आहेत. आता युक्रेनच्या सुरक्षा दलाने आपल्या व्हेरिफाईट फेसबूक अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये एक फायटर पायलट दिसत आहे. या फोटोला कॅप्शन देताना म्हटले आहे की, हॅलो रशियन खलनायकानों, मी तुमच्या आत्मा घेण्यासाठी येत आहे- किव्हचा पिशाच्च. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एकाच दिवशी या फोटोला एका फेसबुक पेजवर हजारो लाईक्स मिळाल्या असून, हजारो वेळा हा फोटो शेअर करण्यात आला आहे.
युक्रेनमध्ये अशी चर्चा सुरू आहे की, घोस्ट ऑफ किव्ह नावाच्या एका फायटर पायलटने १० रशियन फायटर जेट्सचीा शिकार केल्याची चर्चा आहे. मात्र त्याला दुजोरा मिळालेला नाही. तसेच लोक ही काल्पनिक कहाणी असल्याचेही म्हणत आहेत. मात्र यादरम्यान, युक्रेनच्या सुरक्षा दलाने हा फोटो शेअर केला त्यामुळे युक्रेनच्या पिशाच्च्याची चर्चा सुरू झाली आहे. आतापर्यंत रशियाच्या आक्रमणाचा धैर्याने सामना करत असलेल्या युक्रेनच्या सैन्याला आणि सर्वसामान्यांसाठी हे पिशाच्च शौर्याचे प्रतीक बनले आहे. युक्रेनच्या संपूर्ण हवाई दलाकडून या प्रतीकाचा वापर केला जात आहे.
दरम्यान, युक्रेनच्या सुरक्षा दलाने जे फोटो शेअर केले आहेत. त्यामध्ये या पायलटाचे नाव आणि ओळख जाहीर करण्यात आलेली नाही. या फोटोमध्ये एक पायलट ऑक्सिजन मास्क लावलेला दिसत आहे. तसेच तो जे विमान चालवत आहे, ते मिग-२९ असल्याचा अंदाज आहे.
दरम्यान, युक्रेनने केलेल्या दाव्यानुसार या फायटर पायलटने रशियाची अनेक लढाऊ विमाने उद्ध्वस्त केली आहेत. एका रिपोर्टनुसार युद्धाला सुरुवात झाली तेव्हा रशियाकडे सुमारे १२०० लढाऊ विमाने होती. तर युक्रेनकडे केवळ १२४ लढाऊ विमाने होती.