रशिया आणि युक्रेन यांच्यात जवळपास दोन महिन्यांपासून युद्ध (Russia Ukraine War) सुरू आहे. एकीकडे रशियाचे राष्ट्राध्यक्ष सातत्यानं युक्रेनच्या सैन्याला मागे हटण्याचा इशारा देत होते. तर दुसरीकडे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष जेलेन्स्की हेदेखील झुकण्यास तयार नव्हते. परंतु आता गुरूवारी युक्रेनच्या मारियुपोलवर संपूर्ण ताबा मिळवला असल्याचा दावा रशियानं केलं आहे. युक्रेनच्या मारियुपोलवर रशियानं ताबा मिळवल्याची माहिती रशियाच्या सरकारी माध्यमाकडून देण्यात आली.
यादरम्यानच, मारियुपोल येथील अजोवस्तर प्लान्टवर आता बॉम्बचा वर्षाव करू नये असे असे आदेश व्लादिमीर पुतीन यांनी आपल्या सैन्याला दिल्याचंही सांगण्यात येत आहे. याशिवाय या स्टील प्रकल्पाला सुरक्षितरित्या ब्लॉक करण्यास पुतीन यांनी सांगितलं असून एक माशीदेखील बाहेर उडता कामा नये, असे आदेशही त्यांनी दिले. रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेई शोइगु यांच्याशी चर्चेदरम्यान पुतीन यांनी हे आदेश दिले. तसंच त्यांनी मारियुपोल मोहीम यशस्वी केल्याचं सांगत त्यांचं अभिनंदनही केलं. तसंच त्यांनी मारियुपोलला स्वतंत्र घोषित केलं.