Russia Ukraine War : रशियाविरोधात लढण्यासाठी नाटो देशांना तयारीचे आदेश; बायडेन पुतीन यांच्यावर बरसले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2022 08:34 AM2022-03-27T08:34:19+5:302022-03-27T08:34:42+5:30
व्लादिमीर पुतीन यांनी नाटोच्या सीमेत एक इंचही येण्याच्या विचार करू नये, अमेरिका युक्रेनसोबत उभा आहे. युरोपने रशियाच्या हल्लेखोरीविरोधात लढण्यासाठी तयारी करावी, असे आवाहन केले आहे.
वारसॉ: रशिया आणि युक्रेनमध्ये महिना उलटला तरी युद्ध सुरु आहे. दोन्ही देश थोपत नाहीएत. याच काळात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन देखील रशियावर आगपाखड करत आहेत. क्षेपणास्त्रांचे मारे सुरु असताना युक्रेनपासून ५० किमीवर येऊन त्यांनी रशियाला जबर संदेश दिला आहे. नाटो देशांच्या सीमेत एक इंच जरी घुसले तरी त्याचे परिणाम वाईट होतील असा इशारा त्यांनी रशियाला दिला आहे.
व्लादिमीर पुतीन यांनी नाटोच्या सीमेत एक इंचही येण्याच्या विचार करू नये, अमेरिका युक्रेनसोबत उभा आहे. युरोपने रशियाच्या हल्लेखोरीविरोधात लढण्यासाठी तयारी करावी, असे आवाहन केले आहे. याचसोबत पुतीन यांना सत्तेतून हटविण्याचे आवाहन रशियन जनतेला त्यांनी केले आहे. हा व्यक्ती सत्तेत राहू शकत नाही, असे ते म्हणाले.
बाय़डन यांनी पोलंडच्या वारसॉमध्ये रॉयल कॅसलसमोर भाषण केले. यामध्ये त्यांनी पोलंडमध्ये जन्मलेल्या पोप जॉन पॉल द्वितीय यांच्या शब्दांचा वापर केला. युक्रेनवरील पुतीन यांचा हल्ला हे खूप काळ चालणाऱ्या युद्धाचा धोका आहे. या युद्धात आम्हाला स्पष्ट नजर ठेवण्याची गरज आहे. हे युद्ध महिने किंवा दिवसांत जिंकले जाऊ शकत नाही.
या सभेला युक्रेनी शरणार्थी देखील उपस्थित होते. बायडेन यांनी निर्वासितांना भेटल्यानंतर पुतीन यांना खाटीक म्हटले होते. बायडेन यांनी गेल्या आठवडाभरापासून पुतीन यांच्यावर शाब्दिक हल्ले चढविण्यास सुरुवात केली आहे. गेल्या आठवड्यात बायडेननी प्रथम पुतीन यांना युद्ध गुन्हेगार म्हटले आणि नंतर त्यांना खुनी हुकूमशहा म्हटले.