न्यूयॉर्क - युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे रशिया आणि अमेरिका या दोन महाशक्ती आमने-सामने आल्या आहेत. युक्रेनवर आक्रमण करणाऱ्या रशियाची नाकेबंदी करण्यासाठी अमेरिकेकडून कठोर पावले उचलण्यात येत आहेत. दरम्यान, अमेरिकेच्या एका खासदाराने रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची हत्या केली पाहिजे, असे विधान केल्याने खळबळ उडाली आहे. अमेरिकन सिनेटर लिंडसे ग्राहम यांनी हे विधान केले आहे. कुणीतरी व्लादिमीर पुतीन यांची हत्या केली पाहिजे, त्यानंतरच हे युद्ध थांबू शकते, असे ते म्हणाले.
दरम्यान, दक्षिण कॅरोलिनामधील रिपब्लिकन खासदार असलेल्या लिंडसे ग्राहम यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांचा उल्लेख जीनियस असा करणे ही मोठी चूक होती, असेही म्हटले आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या आठवडाभरापासून भीषण संघर्ष सुरू आहे. त्यानंतर रशियावर अमेरिका आणि इतर पाश्चात्य देशांनी अनेक निर्बंध लादले आहेत.
लिंडसे ग्राहम म्हणाले की, रशियामधून या माणसाला बाहेर काढण्याचा एकमेव मार्ग म्हणजे याची हत्या करणे. जर असे केले तर ते हा देश आणि जगावर मोठे उपकार होतील. केवळ रशियातील नागरिकच हे काम करू शकतात. पण हे बोलणे सोपे आहे पण करणे कठीण, असेही त्यांनी अधोरेखित केले.
दरम्यान, गुरुवारी बायडेन यांच्या प्रशासनाने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या काही निकटवर्तीयांवर नवे निर्बंध लागू करण्याची घोषणा केली होती. नव्या निर्बंधांतर्गत पुतीन यांचे प्रेस सचिव दमित्री पेसकोव्ह आणि रशियन उद्योगपती अलीशेर बुरहानोविच यांच्यासह पुतीन यांच्या अजून एका निकटवर्तीयाला लक्ष्य केले होते. दरम्यान, अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने १९ रशियन व्यावसायिकांवर आणि त्यांच्या नातेवाईकांवर व्हिसा निर्बंध लावण्याची घोषणा केली होती.