व्लादिमीर पुतिन पुन्हा आक्रमक मोडवर? रशियानं युक्रेनवर डागले 100 मिसाइल्स; झेलेन्स्की यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 04:46 PM2024-08-26T16:46:47+5:302024-08-26T16:48:06+5:30
Russia Ukraine War: महत्वाचे म्हणजे, पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या युक्रेन दौऱ्यानंतर रशियाने हा हल्ला केला आहे...
यूक्रेनचे राष्ट्रपती व्होलोडिमिर झेलेन्स्की यांनी सोमवारी मोठा दावा केला आहे. रशियाने युक्रेनवर पुन्हा हल्ला केला असून 100 मिसाइल्स डागले आहेत. सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार, युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, रशियाने सोमवारी (26 अगस्त, 2024) रात्री युक्रेनमध्ये पॉवर ग्रिडला निशाना बनवत मोठ्या प्रमाणावर मिसाइल आणि ड्रोन हल्ला केला आहे. या हल्ल्यात किमान 4 जणांचा मृत्यू झाला असून अनेक शहरांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे.
युक्रेनच्या हवाई दलाने म्हटले आहे की, त्यांनी देशातील जवळपास सर्व भागांना निशाणा बनवत डझनावर मिसाइल्स आणि ड्रोनची माहिती मिळवली आहे. यात खार्किव आणि द्निप्रोच्या पूर्वेकडील भागापासून दक्षिणेकडील बंदराचे शहर ओडेसा आणि राजधानी कीवचाही समावेश आहे.
"रशियन दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा पॉवर ग्रीड्सना लक्ष्य केले" -
दरम्यान, युक्रेनचे पंतप्रधान डेनिस श्म्यहाल यांनी सोमवारी टेलीग्रामवर लिहिले आहे, "रशियन दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा पॉवर ग्रीड्सना लक्ष्य केले आहे. तसेच, ड्रोन, क्रूझ मिसाइल आणि हायपरसोनिक मिसाइल्ससह किमान 15 भागांना निशाणा बनवले आहे.
मोदींच्या दौऱ्यानंतर रशियाचा हल्ला -
महत्वाचे म्हणजे, पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या युक्रेन दौऱ्यानंतर रशियाने हा हल्ला केला आहे. मोदी पोलंड वरून ट्रेनने कीवला पोहोचले होते. येथे त्यांनी राष्ट्रपती झेलेन्स्की यांची भेट घेतली. यावेळी, दोन्ही देशांनी एकत्रितपणे या संघर्षावरील समाधान शोधावे, अशी आपली इच्छा असल्याचे मोदी यांनी म्हटले होते. यावेळी त्यांनी चर्चेवर अधिक भर दिला होता.