Russia Ukraine War: रशियाविरोधी देशांवर कठोर कारवाईच्या विचारात व्लादिमीर पुतीन, दिले यादी तयार करण्याचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2022 04:36 PM2022-03-06T16:36:03+5:302022-03-06T16:36:13+5:30
Russia Ukraine War: युक्रेन युद्धात रशियाविरोधात भूमिका घेणाऱ्या देशांविरोधात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन कठोर कारवाई करण्याची तयारी करत असल्याचे वृत्त आहे. तसेच अशा देशांची यादी तयार करण्याचे आदेश दिले आहे.
मॉस्को - युक्रेनविरोधातील आपले आक्रमण रशियाने अधिकच तीव्र केले आहे. दरम्यान, युक्रेन युद्धात रशियाविरोधात भूमिका घेणाऱ्या देशांविरोधात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन कठोर कारवाई करण्याची तयारी करत असल्याचे वृत्त आहे. तसेच अशा देशांची यादी तयार करण्याचे आदेश दिले आहे. त्यासाठी पुतीन यांनी एका विशेष ऑर्डरवर स्वाक्षरी केली आहे. तसेच ८ मार्चपासून रशियामधून आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद करण्यात आली आहेत. प्रवासी आणि मालवाहू विमानांची सेवा रोखण्याचे आदेश दिले आहेत. पाश्चात्य देशांकडून लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे. सध्या अझरबैजान, अर्मेनिया, कझाकिस्तान, कतर, यूएई आणि तुर्कीच्या मार्गातून रशियन नागरिक माघारी परतत आहेत.
दरम्यान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी इशार देताना सांगितले की, युक्रेनचा देशाचा दर्जा धोक्यात आले. तसेच पाश्चात्य देशांकडून लावण्यात आलेले निर्बंध म्हणजे रशियाविरोधात करण्यात आलेल्या युद्धाची घोषणा आहे, असा दावा त्यांनी केला. तसेच ताब्यात आलेल्या मारियुपोलमध्ये दहशतवादी कारवायांमुळे शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं आहे,
यादरम्यान युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी दावा केला की, शनिवारी रशियन सैन्याने मरियुपोलमध्ये मोठ्या प्रमाणात बॉम्बफेक केली. रशियन सैन्य किव्ह आणि उत्तरेकडील चेरनीहीव्हमधील निवासी भागात शक्तिशाली बॉम्ब टाकत आहे. दरम्यान पुतीन यांनी सांगितले की, युक्रेन जे काही करत आहे, ते त्यांनी सुरू ठेवले तर मी युक्रेनच्या देश म्हणून असलेल्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचे आवाहन करेन.
दरम्यान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी रशियाच्या अर्थव्यवस्थेला नुकसान पोहोचवणाऱ्या आणि रशियाचे चलन कमकुवत करण्यासाठी लावण्यात येत असलेल्या निर्बधांवरून पाश्चात्य देशांवर टीका केली आहे. पुतीन यांनी रशियन विमान कंपनी एअरोफ्लोटच्या फ्लाइट अटेंडंटसोबत झालेल्या बैठकीत सांगितले की, लावण्यात येत असलेले निर्बंध हे युद्धाच्या घोषणेप्रमाणे आहेत. तसेट युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी दावा केला की, रशियन तोफखाना आणि विमानांनी बॉम्फफेक करून बाहेर जात असलेल्या लोकांना अडथळा निर्माण केला. दरम्यान, युद्धकाळात रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये दोन फेऱ्यांमधील चर्चा झाली आहे. आता दोन्ही देशांमध्ये तिसऱ्या फेरीतील चर्चा ही सोमवारी होणार आहे.