HIV-हेपेटायटिस रुग्णांचा शस्त्र म्हणून वापर करणार पुतिन? प्रायव्हेट आर्मीत होतेय आजारी कैद्यांची भरती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2022 03:35 AM2022-11-01T03:35:56+5:302022-11-01T03:37:13+5:30
खासगी सैन्यात भरती होणारे हे रुग्ण रशियातील कैदी असल्याचे ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यात जबरदस्त युद्ध सुरू आहे. या युद्धात ज्या पद्धतीने रशियाचा प्रतिकार केला जात आहे, तो व्लादिमीर पुतिन यांना कदापी अपेक्षित नसेल. रशिया काही दिवसांत युक्रेनचा ताबा घेईल, असे मानले जात होते, पण तसे झाले नाही. या युद्धात रोजच्या रोज नवा ट्विस्ट बघायला मिळत आहे. यातच, आता पुतिन यांचे खाजगी सैन्य (वेगनर ग्रुप) एचआयव्ही आणि हिपॅटायटीस सी असलेल्या रूग्णांची भरती करत आहे, ज्यांना युक्रेन युद्धात पाठवण्याची तयारी केली जात असल्याचेही वृत्त आहे.
खासगी सैन्यात भरती होणारे हे रुग्ण रशियातील कैदी असल्याचे ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात येत आहे. यूकेच्या संरक्षण मंत्रालयाचे म्हणणे आहे, की पूर्वीच्या लढायांमध्ये वेगनर ग्रुपमध्ये भरतीचे मानक खूप उच्च होते. हिच्या अनेक ऑपरेटर्सनी प्रोफेशनल सोल्जर म्हणून काम केले आहे. मात्र, आता आजारी कैद्यांची भरती केली जात आहे. यावरून अनुभव आणि गुणवत्तेपेक्षा कशाला अधिक प्राधान्य दिले जात आहे, हे स्पष्ट होते.
'प्रायव्हेट आर्मीत 100 हून अधिक कैद्यांची भरती -
व्लादिमीर पुतिन यांच्या खाजगी सैन्यात 100 हून अधिक कैद्यांची भरती करण्यात आली आहे. ते ओळखले जावेत यासाठी त्यांना रंगीबेरंगी ब्रेसलेट घालण्यात आले आहे. युक्रेनच्या लष्करी गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यामुळे इतर रशियन सैनिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरली आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार अशा सैनिकांना इतर सैनिकांपासून वेगळे ठेवले जात आहे. तसेच त्यांना 'सामान्य सैनिकां'ना भेटण्यापासूनही रोखले जात आहे.