ब्रिटनची गुप्तहेर संघटनेने खळबळजनक दावा केला आहे. या संघटनेचे प्रमुख जेरेमी फ्लेमिंग यांनी मोठा खुलासा केला आहे. रशियन फौजांचा आत्मविश्वास ढासळला असून त्यांच्या सैन्याने रशियाचेच लढाऊ विमान पाडल्याचे म्हटले आहे.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना त्यांचे सल्लागार चुकीची माहिती देत आहेत. कारण ते पुतीन यांना घाबरत आहेत. यामुळे रशियन सैनिक त्यांची उपकरणांची मोडतोड करत असल्याचा दावा जेरेमी यांनी केला आहे. यूकेच्या कम्युनिकेशन मुख्यालयाचे प्रमुख सर जेरेमी फ्लेमिंग म्हणाले की, रशियन सैन्याने ऑर्डर फॉलो करण्यास नकार दिला, त्यांची स्वतःची शस्त्रे आणि उपकरणे तोडली आणि चुकून त्यांचे स्वतःचे विमान उडवले.
ते म्हणाले, व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवर केलेल्या हल्ल्याला ३६ दिवस झाले आहेत. हे धक्कादायक असले तरी आश्चर्यकारक नाही. पुतिन त्यांच्या योजना अंमलात आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र ते अपयशी ठरत आहेत. आता त्यांचा प्लॅन बी युक्रेनी नागरिक आणि शहरांविरोधात सुरु झाला आहे, आणि तो खूप भयानक आहे.
ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटी ऑन ग्लोबल सिक्युरिटीमध्ये फ्लेमिंग बोलत होते. यूकेची गुप्तचर संस्था GCHQ च्या वेबसाइटने त्यांचे भाषण शेअर केले आहे. यामध्ये फ्लेमिंग म्हणतात की पुतिन यांनी परिस्थितीचा मोठ्या प्रमाणात गैरसमज करून घेतला आहे. युक्रेनियन लोकांच्या प्रतिकार शक्तीचा त्यांना अंदाज आला नाही. आम्ही त्यांचे गळीतगात्र, हतबल झालेले सैनिक पाहिले आहेत. पुतीन यांना किती सैनिक मृत झालेत याचा खरा आकडाही दिला जात नाहीय, असे ते म्हणाले.