Russia-Ukraine War: युद्ध सुरू असतानाच दिसून आलं झेलेन्स्कींचं दुःख, रशियानं युक्रेनच्या एवढ्या भागावर केला आहे कब्जा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2022 01:35 AM2022-06-03T01:35:23+5:302022-06-03T01:36:29+5:30
यूकइन्फॉर्म या वृत्त संस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, लोकांना आणि राजकीय नेत्यांना संबोधित करताना राष्ट्रपती झेलेन्स्की म्हणाले, रशियन सैन्याने युक्रेनच्या लोकवस्ती असलेल्या 3,620 ठिकाणांवर हल्ला केला. त्यांपैकी 1,017 आधीच मुक्त झाले आहेत.
रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेले युद्ध अद्यापही थांबण्याचे चिन्ह नाही. यातच, युक्रेनच्या 20 टक्के भूभागावर आता रशियन सैन्याने कब्जा केला आहे. मात्र, युक्रेनच्या सैन्याने युद्ध सुरू झाल्यापासून आतापर्यंत 1,017 ठिकाणं रशियाच्या कब्जातून मुक्त केली आहेत, असे युक्रेनचे राष्ट्रपती वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी गुरुवारी सांगितले.
यूकइन्फॉर्म या वृत्त संस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, लोकांना आणि राजकीय नेत्यांना संबोधित करताना राष्ट्रपती झेलेन्स्की म्हणाले, रशियन सैन्याने युक्रेनच्या लोकवस्ती असलेल्या 3,620 ठिकाणांवर हल्ला केला. त्यांपैकी 1,017 आधीच मुक्त झाले आहेत. इतर 2,603 ठिकाणे मुक्त करणे बाकी आहे. सध्या आमच्या जवळपास 20 टक्के भूभागावर अर्थात 125,000 चौरस किमी भूभागावर रशियाने कब्जा केला आहे.
'युद्धात 243 मुले मारली गेली' -
झेलेन्स्की यांनी दावा केला आहे, की या युद्धात आतापर्यंत 243 मुले मारली गेली आहेत, तर 446 जखमी आणि 139 बेपत्ता आहेत. हा आकडा अधिकही असू शकतो कारण त्यांच्या सरकारकडे रशियन सैन्याने ताब्यात घेतलेल्या भागातील परिस्थितीची माहिती नही.
अमेरिकेने युक्रेनला देणार अत्याधुनिक मिसाइल सिस्टम -
रशिया-युक्रेन युद्धात, अमेरिकेने युक्रेनला अत्याधुनिक मिसाइल सिस्टम आणि इतरही काही शस्त्रास्त्रे देण्याची घोषणा केली आहे. अमेरिकेच्या या घोषणेनेनंतर रशिया जबरदस्त भडकला असून, अमेरिका आगीत तेल टाकत असल्याचे रशियाने म्हटले आहे. रशियाविरुद्ध सुरू असलेल्या युद्धात युक्रेनला अमेरिकेने दिलेल्या मदतीचा हा 11वा हप्ता असेल. यूएस-निर्मित HIMARS ही हाय मोबिलिटी आर्टिलरी रॉकेट सिस्टिम युक्रेनला देण्यात येईल, असे यूएस प्रशासनाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने म्हटले आहे.
अमेरिका आणि रशियाची टक्कर होण्याचा धोका -
अमेरिकेच्या या घोषणेनंतर, युक्रेनला अशा प्रकारच्या शस्त्रास्त्रांची खेप पाठवल्यास थेट अमेरिका आणि रशियाची टक्कर होण्याचा धोका वाढेल, असा इशारा रशियाने दिला आहे. कुठल्याही प्रकारच्या शस्त्रास्त्रांच्या सुरू असलेल्या अथवा वाढणारा पुरवठ्यामुळे धोका अधिक वाढेल, असे रशियाचे उप परराष्ट्रमंत्री सर्गेई रयाबकोव यांनी आरआयए नोवोस्ती या वृत्त संस्थेशी बोलताना म्हटले आहे.