कीव्ह: रशियाचे युक्रेनवरील हल्ले (Russia Ukraine War) सुरूच आहेत. रशिया-युक्रेन युद्धाचा ३२ वा दिवस आहे. गेल्या महिन्याभरापासून दोन्ही देशांमध्ये संघर्ष सुरूच आहे. युक्रेनच्या विविध भागांवर रशियाने केलेल्या भीषण हल्ल्यांमुळे मोठे नुकसान होत आहे. युक्रेनमधील लाखो रहिवासी देश सोडून इतरत्र स्थलांतरित झाले आहेत. अद्यापही रशिया युद्ध थांबवायला तयार नाही. युक्रेनही जोरदार प्रत्युत्तर देत असून, माघार घेण्यास कोणताही देश तयार नाही. यातच आता शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा यांची मदत पोहोचत नाहीये. त्यामुळे वाट पाहून आता दमलो. यानंतर मारिओपोल वाचवणे अशक्य आहे, अशी खंत युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelenskyy) यांनी व्यक्त केली आहे.
रशियाचे युक्रेनच्या विविध भागांवर हल्ले सुरूच आहे. यामध्ये युक्रेनच्या या भागांचे प्रचंड नुकसान आणि अतोनात हानी झाली आहे. ३२ दिवस होऊनही युद्ध थांबत नाहीए. रशिया आणि युक्रेनच्या दरम्यान झालेल्या चर्चेच्या फेऱ्या निष्फळ ठरल्या आहेत. रशियाने युक्रेनमधील मारिओपोल आणि लॅव्हिलवर या दोन ठिकाणी क्षेपणास्त्र हल्ला केला. यानंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांचे वक्तव्य समोर आले आहे. युरोपीय देशांचा समाचार घेताना ते म्हणाले की, आम्ही रशियन क्षेपणास्त्रांचा सामना मशीन गन आणि शॉटगनने करू शकत नाही. आम्ही शस्त्रांची वाट पाहून थकलो आहोत. आता मारिओपोल वाचवणे अशक्य आहे, या शब्दांत झेलेन्स्की यांनी खंत व्यक्त केली आहे.
रशियाकडून क्षेपणास्त्रांनी जबरदस्त हल्ला
राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की म्हणाले की, आता मारिओपोलला वाचवणे शक्य नाही. रशियाने येथे क्षेपणास्त्रांनी जबरदस्त हल्ला केला आहे. रशियाला रोखण्यासाठी आम्हाला रणगाडे आणि विमानांची गरज आहे. पोलंडचे राष्ट्राध्यक्ष आंद्रेझ डुड यांच्याशी झालेल्या व्हर्चुअल भेटीत झेलेन्स्की यांनी युक्रेनला मिग-२९ जेट विमाने न मिळाल्याने आपली निराशा झाल्याचे मत व्यक्त केले. तसेच आता पुन्हा एकदा चर्चेची वेळ आली आहे. जेणेकरून ही आपत्ती थांबवता येईल. रशियाने आपल्या चुका सुधारल्या नाहीत, तर त्याचे परिणाम पुढील पिढ्यांना भोगावे लागतील, असे ते म्हणाले.
दरम्यान, युक्रेनच्या गुप्तचर संस्थांनी दावा केला आहे, की रशियाला ९ मे पर्यंत युद्ध सुरू ठेवायचे आहे. तर युक्रेनचे काही अधिकारी म्हणतात की, ०९ मे या दिवशी रशियाने दुसऱ्या महायुद्धात नाझींवर विजय मिळवला होता. त्यामुळे ९ मे हा दिवस रशियासाठी अतिशय महत्त्वाचा असून, एखाद्या सणाप्रमाणे तो साजरा केला जातो. दुसरीकडे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी रशियाला G20 मधून बाहेर काढावे, अशी इच्छा असल्याचे म्हटले आहे. युक्रेनवरील रशियाच्या हल्ल्यावर नाटोच्या आपत्कालीन बैठकीनंतर बायडन यांनी ब्रुसेल्समध्ये हे भाष्य केले. G20 हा १९ देशांचा आणि युरोपियन युनियनचा एक आंतरशासकीय मंच आहे, जो प्रमुख जागतिक समस्यांवर काम करतो.