Russia Ukraine War: 'आम्हाला विमाने द्या...अन्यथा जमिनीवर रक्तपात वाढेल', युक्रेनची पाश्चिमात्य देशांना विनंती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2022 08:37 AM2022-03-06T08:37:31+5:302022-03-06T08:37:58+5:30
Russia Ukraine War: ''मागील 10 दिवसां 10,000 रशियन सैनिक मारले''-युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचा दावा
कीव: मागील दहा दिवसांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यात भीषण युद्ध सुरू आहे. आतापर्यंतची परिस्थिती पाहता रशिया युक्रेनवर भारी पडत असल्याचे दिसत आहे. यातच आता युक्रेनने पाश्चिमात्य देशांकडे युद्धासाठी शस्त्रे पुरवण्याणी विनंती केली आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की(Volodymyr Zelenskyy) यांनी शनिवारी पाश्चात्य राष्ट्रांकडे रशियन बनावटीची विमाने उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले आहे. तसेच, हवेत लढाई लढण्यासाठी विमाने न मिळाल्यास जमिनीवर रक्तपात वाढेल, अशी भीतीही व्यक्त केली आहे.
युक्रेनला मदतीची गरज
यूएस सिनेटचे नेते चक शूमर यांनी सांगितले की, झेलेन्स्की यांनी शनिवारी यूएस सिनेटर्सशी बोलताना विशेष आवाहन केले. "रशियाला हरवण्यासाठी युक्रेनला रशियन बनावटीच्या विमानांची नितांत गरज आहे. मी त्यांचे हस्तांतरण सुलभ करण्यासाठी सर्वतोपरी मदत करेन,"असेही शुमर यांनी निवेदनात म्हटले.
रशियाने मनोरुग्णालय ताब्यात घेतले
दरम्यान, रशियन सैन्याने युक्रेनच्या कीव प्रदेशातील बोरोडांका शहरातील एक मनोरुग्णालय ताब्यात घेतले आहे. त्या रुग्णालयात 670 रुग्ण असल्याची माहिती आहे. प्रादेशिक गव्हर्नर ओलेक्सी कुलेबा म्हणाले, ''या लोकांना कसे बाहेर काढायचे, त्यांना कशी मदत करायची हे आम्हाला समजत नाहीये. त्यांना पाणी आणि औषधांची सतत गरज असते. हे विशेष गरजा असलेले लोक आहेत, त्यांना सतत मदतीची गरज असते. त्यांच्यापैकी बरेच जण वर्षानुवर्षे अंथरुणाला खिळून आहेत.''
झेलेन्स्कीचा दावा- 10,000 रशियन सैनिक मारले
यातच राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी शनिवारी दावा केला की, युक्रेनियन सैन्याने देशाच्या मध्य आणि आग्नेय भागातील प्रमुख शहरांवर नियंत्रण ठेवले आहे. तसेच, 10 दिवसांच्या युद्धात 10,000 रशियन सैनिक मारले गेल्याचा दावाही ते करत आहेत. रशियाकडून जीवितहानीबद्दल कोणतीही अधिकृत माहिती सामायिक केलेली नाही. रशियन सैन्य सध्या खारकीव्ह, निकोलायव्ह, चेर्निहाइव्ह आणि सुमी यांची नाकेबंदी करण्याचा प्रयत्न करत आहेत.