पाटणा - युक्रेनविरोधात पुकारलेल्या भीषण युद्धामुळे सध्या रशिया चर्चेत आहे. दरम्यान, या युद्धामुळे भारत आणि रशियातील संबंध, युद्धामुळे त्यावर होणाऱ्या परिणांमांचीही चर्चा होत आहे. त्यातच मूळच्या भारतातील पण सध्या रशियाच्या राजकारणात बस्तान बसवणाऱ्या एका व्यक्तीचीही चर्चा सध्या सुरू आहे. डॉ. अभय कुमार सिंह असं त्यांचं नाव आहे. १९९१ मध्ये डॉक्टरकीचं शिक्षण घेण्यासाठी रशियात गेलेले सिंह नंतर रशियातच स्थायिक झाले असून, ते रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या पक्षाकडून आमदार झाले. दरम्यान, अभय कुमार सिंह यांनी रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाचे समर्थन केले आहे.
बिहारमधील पाटणा येथे जन्मलेले अभय कुमार सिंह हे १९९१ मध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी रशियामध्ये गेले होते. त्यानंतर ते काही काळ भारतात आले होते. मात्र नंतर ते पुन्हा रशियात गेले आणि तिथेच राहिले. पुढे ते रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या पक्षाशी जोडले गेले. डॉ. अभय कुमार सिंह यांनी २०१५ मध्ये पुतीन यांच्या पक्षाचे सदस्यत्व घेतले होते. त्यानंतर २०१८ मध्ये त्यांनी रशियातील कुर्स्क येथून निवडणूक जिंकून ते डेप्युटेट (आमदार) बनले होते.
डॉ. अभय कुमार सिंह यांनी रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याला योग्य ठरवले. ते म्हणाले की, रशियाने हल्ला करण्यापूर्वी युक्रेनला इशारा दिला होता. मात्र युक्रेनने रशियाचं म्हणणं ऐकलं नाही. त्यामुळे नंतर हा हल्ला करण्यात आला आहे. ज्या प्रकारे चीन अफगाणिस्तानमध्ये मिलिट्री बेस तयार करत आहे. त्याचप्रमाणे नाटो युक्रेनमध्ये आपला तळ तयार करू इच्छित आहे. जर असे झाले तर नाटो रशियन सैन्याला आव्हान देण्याचा प्रयत्न करू शकते. हे रोखण्यासाठीच हा हल्ला करण्यात आला आहे.
एकंदरीत परिस्थितीत रशिया आणि पार्लामेंटकडे हल्ला करण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नव्हता. दरम्यान, डॉ. अभय यांनी अणुहल्ला करण्याची चर्चा फेटाळून लावली आहे. न्यूक्लियर ड्रिल हे केवळ या प्रकरणात हस्तक्षेप करू इच्छिणाऱ्या देशांना इशारा देण्यासाठी करण्यात आले होते.