Russia Ukraine War: पंतप्रधान मोदींनी युक्रेनच्या राष्ट्रपतींना काय सल्ला दिला होता? खुद्द झेलेन्स्की यांनीच सांगितलं...!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2022 08:57 PM2022-03-08T20:57:35+5:302022-03-08T20:58:26+5:30
राष्ट्रपती पुतिन यांच्यासोबत झालेल्या फोनवरील चर्चेतही याच मुद्द्यावर भर देण्यात आला होता. मात्र अद्याप जमिनीवर संवादाचा मार्ग मोकळा झाल्याचे दिसत नाही.
रशिया आणि युक्रेन यांच्यात गेल्या 13 दिवसांपासून भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांच्याशी फोनवर संवाद साधला होता. आता स्वतः झेलेन्स्की यांनी त्या वेळच्या संभाषणावर भाष्य केले आहे.
झेलेन्स्की म्हणाले, माझी पंतप्रधान मोदींशी चर्चा झाली. काही प्रश्न चर्चेतून सुटत नाहीत. असेही काही पैलू असतात, ज्यांत आपली थेट सक्रियता नसते. मात्र, माणूसकीचा विजय होणे आवश्यक असते. प्रत्येक भीतीवर मात करणे आवश्यक आहे. तो दिवस पुन्हा येईल, जेव्हा युक्रेनचे आकाश सुरक्षित असेल आणि सर्व ठिकाणचे निर्बंध हटलेले असतील. तसेच, या पूर्वीही जेव्हा पंतप्रधान मोदींसोबत चर्चा झाली होती, तेव्हाही त्यांनी, कुटनितीक मार्गाने हा प्रश्न सोडविण्याचा सल्ला दिला होता, असेही झेलेन्स्की यांनी म्हटले आहे.
राष्ट्रपती पुतिन यांच्यासोबत झालेल्या फोनवरील चर्चेतही याच मुद्द्यावर भर देण्यात आला होता. मात्र अद्याप जमिनीवर संवादाचा मार्ग मोकळा झाल्याचे दिसत नाही. दोन्ही देश झुकायला तयार नाहीत आणि हल्ल्यांची मालिकाही सुरूच आहे. सुमीमध्ये रशियाने 500 किलोचा बॉम्ब टाकल्याचा दावाही झेलेन्स्की यांनी केला आहे. मारियुपोलमध्येही एका मुलाचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. अशा स्थितीत दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होताना दिसत आहे.
युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, रशियन सैन्याच्या कारवाईत आतापर्यंत 38 मुलांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर 70 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय 13 दिवसांपासून सुरू असलेल्या या युद्धात एकूण 400 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. याशिवाय, या युद्धात 12,000 हून अधिक रशियन सैनिक मारले गेल्याचा दावाही राष्ट्रपती झेलेन्स्की यांनी केला आहे.