नवी दिल्ली – रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी यूक्रेनविरोधात युद्धाची घोषणा केली आहे. त्यानंतर आता रशियानं यूक्रेनवर मिसाइल हल्ले सुरु केलेत. या दोन्ही देशांमधील तणावाचा जगावर परिणाम होताना दिसत आहे. अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांनी रशियावर अनेक प्रकारचे निर्बंध लादण्यात सुरुवात केली आहे. तर आणखी निर्बंध लावू असा इशाराही दिला आहे. त्यामुळे त्याचा परिणाम भारत-रशिया यांच्यात झालेल्या सुरक्षा करारावरही होण्याची शक्यता आहे. परंतु भारत-रशिया(India-Russia Relations) संबंधांवर याचा परिणाम होणार नसल्याचा विश्वास रशियानं व्यक्त केला आहे.
भारतातील रशियाचे राजदूत रोमन बाबुश्किन यांनी सांगितले की, जागतिक शक्तीच्या रुपाने भारत एक महत्त्वाची भूमिका निभावत आहे. सध्याच्या तणावाचा भारत आणि रशिया यांच्या संबंधांवर काही परिणाम होणार नाही. पुढील महिन्यात होणाऱ्या डिफेन्स एक्स्पोमध्ये रशियाची मोठी भागीदारी आहे. त्याचसोबत भारताने संयुक्त राष्ट्र परिषदेत जी भूमिका घेतली त्याचंही रशियानं स्वागत केले आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन(Vladimir Putin) यांनी सोमवारी पूर्व यूक्रेनच्या डोनेस्तक आणि लुगांस्क यांना स्वतंत्र्य देश म्हणून मान्यता दिली आहे. त्यानंतर UNSC ची तातडीची बैठक बोलावण्यात आली. यात भारताने दोन्ही देशांना शांतता व संयम राखण्याचं आवाहन केले.
S-400 व्यवहारावर काय परिणाम होईल?
भारत आणि रशिया यांच्यातील S-400 मिसाइल डिफेन्स सिस्टम खरेदी करण्याचा व्यवहार झाला आहे. त्याची डिलिवरीही सुरु झाली आहे. मात्र पाश्चिमात्य देशांनी लावलेल्या निर्बंधाचा यावर परिणाम होईल का? त्यावर रशियाने थेट उत्तर दिले नसले तरी हा व्यवहार यापुढेही सुरु राहील असं उत्तर दिले आहे. आम्ही सुरक्षेसह सर्व मुद्द्यांवर पाश्चिमात्य देशांच्या निर्बंधांचा नकारात्मक परिणाम कितपत होईल त्यावर लक्ष ठेवून आहोत. परंतु भारताचा मुद्दा येतो तिथं आमच्याशी त्यांचे मजबूत आणि विश्वासू संबंध आहेत. आम्ही भारतासोबत नेहमी मित्र म्हणून काम करतो. आमचे प्लॅन मोठे आहेत. आमची भागीदारी अशीच सुरु राहील अशी अपेक्षा आहे असं रशियानं म्हटलं.
निर्बंधामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम
रशियाचे राजदूत रोमन बाबुश्किन म्हणाले की, निर्बंधामुळे रशियाच्या अर्थव्यवस्था आणि बॅकिंग सिस्टमवर वाईट परिणाम होईल. परंतु त्याचसोबत जागतिक अर्थव्यवस्थेलाही फटका बसेल. कारण जे भय आणि अविश्वासाचं वातावरण निर्माण केले जात आहे. भारत आणि रशियाचे संबंध मजबूत विचारांवर आहेत. भारत आणि रशियानं कधीही एकमेकांना निर्बंधावर धमकावलं नाही. एकमेकांच्या राष्ट्रीय मुद्द्यात दखल देत नाही. भारत-रशिया नेहमी खांद्याला खांदा लावून पुढे जात आहे असं त्यांनी सांगितले.