Russia Ukraine War: साऱ्या लढाईत रशियाची एअर फोर्स कुठेय? पहिल्या दिवशी आली, अचानक गायब झाली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2022 11:51 AM2022-03-03T11:51:05+5:302022-03-03T11:51:23+5:30
Russia Ukraine War: जमिनीवरील लढाईला हवेतून पाठबळ हवे असताना ऐन मोक्याच्या क्षणी रशियन एअर फोर्स युद्धातून गायब झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. यामुळे प्रत्यक्षात युद्ध लढणारे सैनिकही हतबल झाले आहेत.
रशियाने युक्रेनवर हल्ला केल्याला आता सात दिवस झाले आहेत. रशियाने हल्ले वेगवान केले असून रशियन सैन्याला जोरदार प्रत्यूत्तर मिळू लागले आहे. जमिनीवरील लढाईला हवेतून पाठबळ हवे असताना ऐन मोक्याच्या क्षणी रशियन एअर फोर्स युद्धातून गायब झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. यामुळे प्रत्यक्षात युद्ध लढणारे सैनिकही हतबल झाले आहेत.
दुसरीकडे युक्रेनकडून रशियन फौजांच्या ताफ्यावर ड्रोन हल्ले, हवाई हल्ले वाढले आहेत. पोलंडसह अन्य युरोपीयन देशांनी जवळपास ७० हून अधिक लढाऊ विमाने युक्रेनला दिली आहेत. अशा परिस्थितीत रशियाचे हवाई दल कुठे आहे, असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.
दोन्ही देशांची तुलना केली तर रशियाकडे जवळपास दीड हजार लढाऊ विमाने आहेत. तर युक्रेनकडे फक्त ६०. रशियाकडे ५०० हेलिकॉप्टर आहेत तर युक्रेनकडे फक्त ३५. रशियाने मिसाईल हल्ल्यांवर जास्त भर दिला आहे. मात्र, या मिसाईलचे हल्ले देखील तेवढे अचूक नाहीएत. ते कोणत्याही रहिवासी इमारतीवर जाऊन आदळत आहेत. अशावेळी युक्रेनच्या सैन्याला, त्यांच्या ताफ्याला टिपण्यासाठी रशियाचे हवाई दल खूप मोलाची भूमिका निभावू शकते. परंतू पहिल्या दिवशी युक्रेनच्या हवाई दलाकडून सपाटून मार खाल्ल्याने दुसऱ्या दिवशीपासून रशियाचे हवाई दलच युद्धातून गायब झाले आहे.
रशियाची डझनावर लढाऊ विमाने युक्रेनने पाडल्याचा दावा केला होता. तसे फोटो देखील प्रसारित केले होते. युक्रेनवर हल्ला करण्यास रशियन सैनिकही आता नकार देऊ लागले आहेत. त्यांना ना पाणी ना अन्नधान्य आणि रणगाडे, मिलिट्री वाहनांना इंधन मिळत आहे. यामुळे ते वैतागले आहेत. त्यातच युक्रेनची जनता देखील कडवा प्रतिकार करू लागल्याने ते नामोहरम झाले आहेत. अशावेळी या सैनिकांना हवाई दलाची मदत मिळाली असती तर युक्रेनमध्ये वेगाने मुसंडी मारता आली असती, परंतू हवाई दलचा यातून रहस्यमयरित्या बाहेर पडल्याने जगभरातून आश्चर्य व्यक्त होऊ लागले आहे.