रशियावरील निर्बंधांचा भारतावर परिणाम होणार?; अमेरिकेचा दबाव वाढला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2022 07:13 AM2022-04-30T07:13:08+5:302022-04-30T07:13:50+5:30

रशियन सैनिकांच्या गुन्ह्यांची चौकशी करण्यासाठी युक्रेनला ब्रिटनची मदत, गैरकृत्य उजेडात आणणार : महिलांवर अत्याचार झाल्याचा आरोप

Russia Ukraine War: Will sanctions on Russia affect India ?; US pressure increased | रशियावरील निर्बंधांचा भारतावर परिणाम होणार?; अमेरिकेचा दबाव वाढला

रशियावरील निर्बंधांचा भारतावर परिणाम होणार?; अमेरिकेचा दबाव वाढला

googlenewsNext

लंडन : युक्रेनमध्ये रशियाच्या सैनिकांनी युद्धात अनेक गुन्हे केल्याचा आरोप आहे. या गुन्ह्यांची चौकशी करण्यासाठी युक्रेनला ब्रिटनचे तज्ज्ञ मदत करणार आहेत. ब्रिटनच्या परराष्ट्रमंत्री लिझ ट्रूस यांनी ही माहिती दिली. 

रशियाच्या सैनिकांनी केलेल्या गुन्ह्यांचे पुरावे गोळा करण्यासाठी ब्रिटनचे तज्ज्ञ युक्रेनला मदत करतील.  रशियाच्या सैनिकांनी युक्रेनमधील महिलांवर लैंगिक अत्याचारही केल्याचा आरोप आहे. ब्रिटनचे तज्ज्ञ मे महिन्याच्या प्रारंभी पोलंडमध्ये येणार असून ते तिथे इतर देशांतील तज्ज्ञ, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, निर्वासित, युक्रेनचे सरकारचे अधिकारी यांचीही भेट घेणार आहेत.  ब्रिटनच्या परराष्ट्रमंत्री लिझ ट्रूस म्हणाल्या की, रशियाच्या सैनिकांनी युक्रेनमध्ये महिलांना अतिशय क्रूर वागणूक दिली आहे. त्या साऱ्या घटना व पुतिन सरकारच्या गैरकृत्यांचे सत्य उजेडात आणण्याचे काम ब्रिटनचे तज्ज्ञ युक्रेनच्या मदतीने करणार आहेत. 

युक्रेनला पाठिंबा देण्यासाठी भारताचे मन वळविण्याचा अमेरिकेचा प्रयत्न

वॉशिंग्टन : युक्रेनची पाठराखण करण्याची अमेरिकेची भूमिका आहे. युक्रेनला आर्थिक मदत देणे, रशियाविरोधात निर्बंध लादणे या अमेरिकेने घेतलेल्या निर्णयांना भारताने पाठिंबा द्यावा अशी अपेक्षा आहे. पुढील महिन्यात जपानमध्ये होणाऱ्या क्वाड परिषदेमध्ये राष्ट्राध्यक्ष जो बायडेन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करणार आहेत. व्हाइट हाउसच्या प्रसारमाध्यम सचिव जेन साकी यांनी सांगितले की, रशियाने युक्रेनविरोधात सुरू केलेले युद्ध अन्यायकारक आहे. 

भारताने रशियाशी मर्यादित स्वरूपात आर्थिक संबंध राखावेत याकरिता पाश्चिमात्य देश दबाव आणत आहेत. युक्रेनविरोधात युद्ध सुरू करणाऱ्या रशियाचा भारताने जाहीर निषेध करावा, अशीही अमेरिकेसह अनेक देशांची इच्छा आहे. युक्रेनवर आक्रमण केल्याबद्दल रशियाचा भारताने अजून जाहीर निषेध केलेला नाही. क्वाड परिषदेत जपान, भारत, ऑस्ट्रेलिया, अमेरिका हे देश सहभागी होत आहेत. क्वाड परिषदेदरम्यान जो बायडेन व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या होणाऱ्या चर्चेत युक्रेन प्रश्नावरही सविस्तर चर्चा होणार आहे.

रशियावरील निर्बंधांचा भारतावर परिणाम होणार?
पाश्चिमात्य देशांनी रशियावर घातलेल्या आर्थिक निर्बंधांचा भारतावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रश्नाचा गुंता सोडविण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांवर आंतरमंत्रालयीन गटातर्फे विचार सुरू आहे, असे परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितले होते. 

Web Title: Russia Ukraine War: Will sanctions on Russia affect India ?; US pressure increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.