Russia Ukraine War : सर्व भारतीय सुखरूप मायदेशी परतत नाहीत, तोवर इथून निघणार नाही; किरेन रिजिजूंचा निर्धार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2022 11:59 AM2022-03-03T11:59:26+5:302022-03-03T12:01:29+5:30
सध्या रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धात (Russia Ukraine War) अनेक भारतीय नागरिक युक्रेनमध्ये अडकले आहेत.
Russia Ukraine War : सध्या रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धात (Russia Ukraine War) अनेक भारतीय नागरिक युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यांना युक्रेनमधून सुरक्षित बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारनं 'मिशन गंगा' या अंतर्गत पावलं उचलली आहे. तसंच अडकलेल्या लोकांच्या मदतीसाठी केंद्र सरकारचे चार मंत्री युक्रेनच्या शेजारी राष्ट्रांमध्ये पोहोचलेत. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू हेदेखील स्लोव्हाकियामध्ये पोहोचले असून ते भारतीयांना युक्रेनमधून बाहेर काढण्यासाठी काम करत आहेत. अशात त्यांनी युक्रेनमधून सर्व भारतीयांना सुरक्षित बाहेर काढत नाही, तोवर माघारी येणार नाही असा निर्धार केला आहे.
"सर्व भारतीयांना त्या ठिकाणाहून सुरक्षित बाहेर काढण्याला आमचं प्राधान्य आहे. कोणताही भारतीय मागे राहू नये असे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत. ज्या ठिकाणी गोळीबार आणि बॉम्ब टाकले जात आहेत त्या ठिकाणी दुतावासाच्या कर्मचाऱ्यांना पोहोचणं शक्य नाही. सर्वांना बाहेर काढणं इतकं सोपं नाही. परिस्थिती ही खुप आव्हानात्मक आहे. परंतु आम्ही सर्वच झोकून प्रयत्न करत आहोत," असं रिजिजू म्हणाले.
आपल्याला घरी सुरक्षित पोहोचवण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, असा संदेश आपल्या पालकांपर्यंत पोहोचवा, असंही ते विद्यार्थ्यांना म्हणाले. "युक्रेनमधून सर्व भारतीयांना सुरक्षित बाहेर काढल्याशिवाय मी या ठिकाणाहून परतणार नाही. सर्व भारतीयांना लवकरात लवकर आणि सुरक्षितरित्या त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचे निर्देश पंतप्रधान मोदींनी दिले आहेत. या स्थितीत केवळ भारतच अशी मोहीम राबवत आहे," असंही त्यांनी नमूद केलं.
दिलासा पाहून आनंद
युक्रेनमधून स्लोव्हाकियाला पोहोचलेल्या आमच्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर मोठा दिलासा पाहून आनंद झाला. या सर्वांची योग्य काळजी घेतली जात आहे. प्रदीर्घ परिश्रमानंतर आमच्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य पाहून आनंद झाला. घरी सुरक्षित प्रवास करा, असंही काही विद्यार्थ्यांना रवाना करताना रिजिजू म्हणाले.