Russia Ukraine War : युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक बँकेची मोठी कारवाई; रशिया, बेलारूसमधील सर्व प्रकल्प थांबवले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2022 09:40 AM2022-03-03T09:40:25+5:302022-03-03T09:40:47+5:30
Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध आठव्या दिवशीही सुरूच आहे. अशातच रशियावर अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. आता जागतिक बँकेनंही रशियाविरोधात मोठं पाऊल उचललं आहे.
Russia Ukraine News : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध आठव्या दिवशीही सुरूच आहे. या युद्धात मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी आणि आर्थिक नुकसानही झालं आहे. अशा परिस्थितीत अनेक देश रशियाविरोधात उभे राहिले आहेत. तर दुसरीकडे अनेक निर्बंध लादल्यानंतरही रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे माघार घेण्यास तयार नाहीत. संयुक्त राष्ट्राच्या महासभेत युक्रेनमधून रशियन सैन्य माघारी बोलावण्याचा प्रस्ताव पारित करण्यात आला. अशातच आता जागतिक बँकेनेही मोठं पाऊल उचललं आहे.
जागतिक बँकेनं रशिया आणि त्याचा सहकारी देश बेलारुसवर मोठी कारवाई केली आहे. जागतिक बँकेनं या ठिकाणी सुरू असलेल्या आपल्या सर्व प्रकल्प स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी युक्रेनच्या जनतेला संबोधित केलं. "या ठिकाणी त्यांना काहीही मिळणार नाही हे सर्व घुसखोरांनी समजायला हवं. त्यांना विजय मिळणार नाही. कोणतीही उपकरणं, कितीही लोकांसोबत ते आले तरी काही बदलणार नाही. त्यांचा पराभव होणारच," असा इशारा त्यांनी दिला.
"रशियाचे केवळ चार मित्र आहेत. यामध्ये नॉर्थ कोरिया, इरिट्रिया, सीरिया आणि बेलारूस आहे. या चारही राष्ट्रांनी संयुक्त राष्ट्र महासभेत रशियाच्या विरोधात आलेल्या प्रस्तावाच्या विरोधात मतदान केलं. या प्रस्तावात रशियन सैन्याला बाहेर काढण्याबाबत नमूद करण्यात आलं होतं," असं झेलेन्स्की म्हणाले.