Russia Ukraine War: जगात तिसऱ्या महायुद्धाचा धोका; रशियाचा इशारा तर भारतानं म्हटलं...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 05:42 AM2022-04-27T05:42:57+5:302022-04-27T05:43:27+5:30
युक्रेनला पाश्चिमात्य देशांकडून वाढता पाठिंबा मिळतोय. युक्रेनने रशियन सैन्याशी लढण्यासाठी ही राष्ट्रे त्याला शस्त्रे पुरवत आहेत
किव्ह : युक्रेनला आणखी शस्त्रे पुरविण्यासाठी अमेरिका आणि त्याच्या मित्र देशांच्या नियोजित बैठकीच्या पार्श्वभूमीवर रशियाने खरेखुरे तिसरे महायुद्ध भडकू शकते, असा इशारा दिला आहे.
युक्रेनला पाश्चिमात्य देशांकडून वाढता पाठिंबा मिळतोय. युक्रेनने रशियन सैन्याशी लढण्यासाठी ही राष्ट्रे त्याला शस्त्रे पुरवत आहेत. मात्र या पाश्चिमात्य देशांची युक्रेनमध्ये स्वत:ला जास्त गुंतवून घेण्याची तयारी नाही. कारण त्यांना अण्वस्त्रसज्ज असलेल्या रशियाशी आपला संघर्ष वाढेल, ही भीती आहे. रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जी लावरोव्ह रशियन वृत्त संस्थांशी बोलताना, तिसऱ्या महायुद्धाचा गंभीर धोका असल्याचा इशारा दिला. शांततेसाठीची बोलणी कशीबशी पुढे नेण्याच्या युक्रेनच्या भूमिकेवर त्यांनी टीका केली.
‘महायुद्धासाठी चिथावणी देऊ नका’
रशियाने मंगळवारी पूर्व युक्रेनवर हल्ला केला, त्यादरम्यान रशियाच्या एका वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्याने युक्रेनला तिसरे महायुद्ध भडकाविण्याविरुद्ध इशारा दिला. तसेच अण्वस्त्र संघर्षाच्या इशाऱ्याला कमी न लेखण्याचाही इशारा दिला आहे. दरम्यान, ब्रिटनच्या संरक्षणमंत्र्यांंनी मंगळवारी सांगितले की, रशियन फौजांनी युक्रेने क्रेमिना हे शहर ताब्यात घेतले आहे. यावर युक्रेन सरकारची प्रतिक्रिया मिळाली नाही.
अमेरिका, मित्र देश युक्रेनच्या पाठीशी...
दुसरीकडे, अमेरिकेने युक्रेनला आणखी शस्त्रे देण्याची घोषणा केली. पाश्चिमात्य मित्र देशांच्या सहकार्याने दोन महिन्यांपासून चाललेल्या युद्धावर परिणाम झाला आहे, असेही अमेरिकेने म्हटले आहे. युक्रेनला आवश्यक शस्त्रांची मदत देण्यासाठी आकाश-पाताळ एक करू. अमेरिका आणि मित्र देश युक्रेनच्या पाठीशी असल्याची ग्वाही अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉइड ऑस्टिन यांनी दिली. त्यांनी जर्मनीतील अमेरिकेच्या रॅमस्टाइन हवाईतळावर ४० देशांच्या प्रतिनिधींची बैठक बोलवली आहे. यावर मॉस्कोने म्हटले आहे की, पाश्चिमात्य देशांच्या अशा प्रकारच्या मदतीमुळे युक्रेनला युद्धाची जोखीम आणखी वाढण्याचा इशारा दिला.
संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस ॲन्टोनियो गुतारेस यांनी युक्रेनमधील युद्ध थांबविण्याचे आवाहन केले. मॉस्को दौऱ्यांवर असलेले गुतारेस यांनी रशियाचे विदेशमंत्री सर्गेई लाव्हारोव यांच्यासोबतच्या बैठकीच्या सुरुवातीला उपरोक्त आवाहन केले. नंतर युक्रेनची राजधानी कीव्हचाही दौरा करणार आहेत. चर्चेसाठी अनुकूल वातावरण तयार करणे, लवकरात लवकर युद्ध विराम आणि शांततेच्या मार्गाने समस्यांवर तोडगा काढण्यासाठी योग्य स्थिती निर्माण करणे, यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत, असे गुतारेस म्हणाले.
हे संकट युरोपसाठी इशारा असू शकतो - भारत
युक्रेनमधील संकट युरोपासाठी इशारा असू शकतो; आशियात काय चालले, हेही युरोपने पाहायला हवे. कारण गेल्या दहा वर्षांपासून जगातील हा भाग सहजसोपा नाही, असे भारताचे विदेश मंत्री एस. जयशंकर यांनी युक्रेनच्या मुद्द्यावरून भारतावर होत असलेल्या टीकेला उत्तर देताना स्पष्ट केले. ‘रायसीना परिसंवाद’मध्ये एका सत्रात तेे बोलत होते. पाश्चिमात्य शक्ती आशियापुढे उभ्या ठाकणाऱ्या आव्हानांबाबत अनभिज्ञ आहे; ज्यात मागच्या वर्षी अफगाणिस्तानमध्ये घडलेल्या घटना आणि या विभागातील नियम आधारित व्यवस्थेवर असलेल्या दबावाचा समावेश आहे. युक्रेनच्या स्थितीवर नॉर्वेचे विदेश मंत्री ॲनिकेन ह्युईतफेल्ड यांच्या प्रश्नावर जयशंकर यांनी सांगितले की, युद्ध तत्काळ थांबवून राजनैतिक व वाटाघाटीच्या मार्गावर परतण्यासाठी भारत दबाव टाकत आहे. या परिसंवादात नॉर्वे, लक्झम्बर्गच्या विदेश मंत्र्यांसह स्वीडनचे माजी पंतप्रधान कार्ल बिल्ड यांनी युक्रेन संकटावर विचारलेल्या प्रश्नांना जयशंकर यांनी सडेतोड उत्तरे दिली.