कीव्ह : युक्रेनच्या युद्धाला उद्या, २४ फेब्रुवारी रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. या युद्धात रशियाने मानवी हक्कांचा सातत्याने भंग केला आहे, अशी टीका युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर जेलेन्स्की यांच्या पत्नी (त्या देशाच्या ‘फर्स्ट लेडी’) ओलेना जेलेन्स्का यांनी केली आहे. आम्हाला मुक्त वातावरणात जगण्याचा अधिकार आहे. आम्हाला ठार मारण्याचा किंवा छळण्याचा अधिकार कोणालाही दिलेला नाही, असेही त्यांनी रशियाचे नाव न घेता त्या देशाला सुनावले.
संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत ओलेना जेलेन्स्का यांनी सांगितले की, युक्रेनचे बाखमूत शहरावर कब्जा करण्याचा रशियाचा प्रयत्न असून तिथे प्रचंड विध्वंस करण्यात आला आहे. नागरी वस्त्यांवर तोफगोळे, क्षेपणास्त्रांचा मारा केला जात आहे. काही शहरांमध्ये रशियाच्या सैन्याने हत्याकांडे घडविली. नागरिकांचे मृतदेह सामुदायिक दफनभूमीत पुरण्यात आले. युद्धात असंख्य लोक जखमी झाले आहेत. या युद्धात युक्रेन जिंकला तर तो मानवी हक्कांनी छळवाद, विध्वंसक प्रवृत्तींवर मिळविलेला विजय असणार आहे.
युद्धामुळे आंतरराष्ट्रीय कायद्यांचा भंग : संयुक्त राष्ट्रेरशियाने युक्रेनविरुद्ध पुकारलेले युद्ध अन्यायकारक असून संयुक्त राष्ट्रांचा जाहीरनामा, आंतरराष्ट्रीय कायद्यांचा भंग करणारे आहे, अशी टीका संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी केली आहे. युक्रेनमध्ये लवकरात लवकर शांतता प्रस्थापित व्हायला हवी. रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणामुळे जगभरात तणाव निर्माण झाला आहे, असेही त्यांनी सांगितले.