झेलेन्स्की यांनी पुतीन यांना पुन्हा दाखवला इंगा, युक्रेनकडून रशियावर परत एकदा ड्रोन हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2024 01:53 PM2024-09-10T13:53:56+5:302024-09-10T13:54:04+5:30
Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये सुरू असलेलं युद्ध अधूनमधून जोरदार भडकत आहे. त्यातच युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांनी पुतीन यांना पुन्हा एकदा इंगा दाखवला असून, रशियाची राजधानी मॉस्कोच्या आसपास ड्रोनच्या मदतीने जोरदार बॉम्बफेक केली.
रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये सुरू असलेलं युद्ध अधूनमधून जोरदार भडकत आहे. त्यातच युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांनी पुतीन यांना पुन्हा एकदा इंगा दाखवला असून, रशियाची राजधानी मॉस्कोच्या आसपास ड्रोनच्या मदतीने जोरदार बॉम्बफेक केली. त्यामुळे मॉस्कोच्या आसपासचा परिसर हादरून गेला. दरम्यान, आम्ही युक्रेनचे १४४ ड्रोन पाडले, असा दावा रशियाकडून करण्यात आला आहे.
मॉस्को आणि आसपासच्या भागात युक्रेनने केलेल्या ड्रोन हल्ल्यामध्ये किमान एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती या क्षेत्रातील गव्हर्नर अँड्री वोरोब्योव यांनी दिली आहे. त्यांनी सांगितले की, आधी या हल्ल्यामध्ये एका मुलाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र हल्ल्यात जखमी झालेल्या तीन जणांपैकी एका ४६ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.
रशियन अधिकाऱ्यांनी सांगितले की, मंगळवारी मॉस्कोच्या आसपास झालेल्या ड्रोन हल्ल्यामध्ये किमान १४४ ड्रोन पाडण्यात आले आहेत. या हल्ल्यात अनेक निवासी इमारतींना आग लागली. त्यात एका महिलेचा मृत्यू झाला. तसेच ३० हून अधिक विमान उड्डाणे रोखण्यात आली. रशियातील दक्षिण-पश्चिम ब्रायंस्क भागाच्या गव्हर्नरनी सांगितले की, युक्रेनच्या सीमेजवळ असलेल्या या भागात ६० हून अधिक ड्रोन पाडण्यात आले. मात्र या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.