Russia Ukraine War: बायडेन यांच्या २ मंत्र्यांचा कीव्ह दौरा; जेलेन्स्कींशी चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 07:34 AM2022-04-26T07:34:45+5:302022-04-26T07:35:03+5:30
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी दावा केला की, युद्धामध्ये युक्रेनला यश, तर रशियाला अपयश येत आहे.
कीव्ह : अमेरिकेने युक्रेनला अतिरिक्त ५३ अब्ज ६५ कोटी रुपयांची लष्करी मदत देण्याची घोषणा केली आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटोनी ब्लिंकन व संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांनी युक्रेनची राजधानी कीव्ह येथे जाऊन राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की यांच्याशी युद्धाशी संबंधित बाबींवर सविस्तर चर्चा केली. युद्ध सुरू झाल्यानंतर अमेरिकेच्या वरिष्ठ नेत्यांनी प्रथमच युक्रेनचा दौरा केला आहे.
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी दावा केला की, युद्धामध्ये युक्रेनला यश, तर रशियाला अपयश येत आहे. युक्रेनला ३०हून अधिक देश सक्रिय मदत करीत असून, आम्ही रशियावरील दबाव आणखी वाढविणार आहोत. अमेरिकेने दिलेल्या मदतीबाबत राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे जेलेन्स्की यांनी आभार मानले आहेत. युक्रेनला मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे व आर्थिक मदत देण्यात येत आहे. रशियावर इतर देशांनी लादलेल्या निर्बंधांबाबतदेखील जेलेन्स्की, ब्लिंकन, ऑस्टिन यांच्यात सुमारे तीन तास चाललेल्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. रशियाने आता पूर्व युक्रेनमधील डोनबास प्रांतात हल्ल्यांचे प्रमाण वाढविले आहे. त्या पार्श्वभूमीवर पाश्चिमात्य देशांनी शस्त्रास्त्रांची मोठ्या प्रमाणावर मदत करावी, अशी मागणी जेलेन्स्की यांनी केली होती. त्याला अमेरिकेने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
उणीव भरून काढली
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन काही दिवसांपूर्वी पोलंडच्या दौऱ्यावर गेले होते. तिथे त्यांनी युक्रेनच्या निर्वासितांची स्थिती जाणून घेतली.
मनात असूनसुद्धा केवळ सुरक्षेच्या कारणापायी बायडेन यांनी युक्रेनला भेट दिली नव्हती; पण आता त्यांच्या मंत्रिमंडळातील दोन महत्त्वाच्या मंत्र्यांनी युक्रेनचा दौरा करून ती उणीव थोड्या प्रमाणात का होईना भरून काढली आहे.
मारियुपोलमध्ये युक्रेन सैनिकांची कडवी झुंज
मारियुपोल या शहरातील स्टील प्रकल्पाच्या आडोशाने युक्रेनचे सैनिक रशियाशी कडवी झुंज देत आहेत. त्यामुळे या शहरासह डोनबासवर संपूर्ण कब्जा करणे रशियाला अद्याप शक्य झालेले नाही, असा दावा ब्रिटनच्या संरक्षण खात्याने केला आहे.