Russia Victory Day: '1945 प्रमाणे आताही आमचा विजय होणार', व्लादिमीर पुतिन यांचे यूक्रेनसह 15 देशांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2022 09:48 AM2022-05-09T09:48:21+5:302022-05-09T09:48:31+5:30
Russia Victory Day: रशिया दरवर्षी दुसऱ्या महायुद्धातील नाझी जर्मनीचा पराभव साजरा करतो. या खास प्रसंगी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी 15 देशांना शुभेच्छा संदेश पाठवले आहेत.
Russia Victory Day:रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाला जवळपास 100 दिवस पूर्ण झाले आहेत. या युद्धात एकीकडे रशियाने युक्रेनमधील जवळपास सर्व शहरे उद्ध्वस्त केली आहेत, तर दुसरीकडे रशियामध्ये विजय दिनाची तयारी जोरात सुरू झाली आहे. रशिया दरवर्षी दुसऱ्या महायुद्धातील नाझी जर्मनीचा पराभव साजरा करतो.
या खास प्रसंगी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी 15 देशांना शुभेच्छा संदेश पाठवले आहेत. या देशांमध्ये युक्रेनचाही समावेश आहे. संदेशात लिहिले आहे- 1945 प्रमाणे विजय आमचाच असेल. संदेशात पुतिन यांनी आपल्या सैन्याचे कौतुक केले आणि म्हटले की, 'पूर्वजांप्रमाणे आमचे सैनिकही मातृभूमीला नाझींपासून मुक्त करण्यासाठी लढत आहेत. आज नाझीवाद रोखणे हे आपले कर्तव्य आहे."
युक्रेनसह या देशांना संदेश पाठवला
रशियामध्ये विजय दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदाही या विशेष सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. माजी सैनिक युद्धाशी संबंधित स्मारकांवर पुष्पांजली अर्पण करतात. रशियातील दुसरे महायुद्ध हे महान देशभक्त युद्ध म्हणून ओळखले जाते. रशियाने अझरबैजान, आर्मेनिया, बेलारूस, कझाकिस्तान, किर्गिस्तान, मोल्दोव्हा, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान, अबखाझिया, दक्षिण ओसेशिया, डीपीआर, एलपीआर आणि जॉर्जिया येथील लोकांना संदेश पाठवले आहेत. या देशांमध्ये युक्रेनचाही समावेश आहे.