मॉस्को: युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये युद्ध सुरू होऊन दोन महिने उलटले आहेत. अमेरिका आणि युरोपमधील अनेक देशांनी रशियाविरोधात थेट भूमिका घेत निर्बंधांची घोषणा केली. मात्र रशियाचा आक्रमक पवित्रा कायम आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या एका धमकीनं संपूर्ण युरोप हादरला आहे.
रशियाचे 'मित्र नसलेल्या' देशांना रशियाकडून नैसर्गिक वायू खरेदी करताना व्यवहारासाठी रशियन चलन असलेलं रुबल वापरावं लागेल, अशी धमकी पुतीन यांनी गेल्याच महिन्यात दिली होती. नैसर्गिक वायू खरेदी केल्यावर संपूर्ण रक्कम रुबलमध्ये द्यावी लागेल, अशी धमकीच पुतीन यांनी दिली. ती धमकी आता पुतीन यांनी खरी करून दाखवली आहे. त्याचा फटका बल्गेरिया आणि पोलंडला बसला आहे. या देशांना होत असलेला नैसर्गिक वायूचा पुरवठा रशियानं थांबवला आहे.
पुतीन यांच्या धमकीनंतर युरोपातील ४ देशांनी रशियाशी जुळवून घेण्याची भूमिका स्वीकारली आहे. रुबलमध्ये व्यवहार करण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे. युक्रेनविरोधात युद्ध सुरू असतानाही रशियानं युरोपियन देशांना होत असलेला नैसर्गिक वायूचा पुरवठा सुरुच ठेवला. मात्र युरोपियन देशांनी रशियाविरोधात भूमिका घेताच रशियानं आक्रमक पवित्रा घेतला आणि केवळ रुबलमध्येच व्यवहार करण्याची अट घातली.
रुबलमध्ये व्यवहार न केल्यानं पोलंड आणि बल्गेरियाला होत असलेला वायू पुरवठा रोखण्यात आल्याची माहिती रशियाच्या सरकारी वृत्तसंस्थेनं दिली आहे. त्यानंतर संपूर्ण युरोपात खळबळ माजली आहे. रशिया ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप बल्गेरिया आणि पोलंडनं केला आहे. रशियन सरकार कराराचं उल्लंघन करत आहे. पण आम्ही झुकणार नाही, असा पवित्रा बल्गेरियाचे पंतप्रधान किरील पेतकोव यांनी घेतला.