कीव्ह : युक्रेनच्या लविव्ह शहरातील ऐतिहासिक रिनोक चौकात १०९ रिकाम्या बाबागाड्या (स्ट्रोलर्स) काही रांगांमध्ये उभ्या केलेल्या होत्या. त्या परिसरात नीरव शांतता पसरलेली होती. रशियाने केलेल्या आक्रमणात आतापर्यंत १०९ बालकांचा मृत्यू झाला आहे. या भीषण कृत्याचा रिकाम्या बाबागाड्यांच्या माध्यमातून युक्रेनमधील नागरिकांनी निषेध केला. हृदय पिळवटून टाकणारे ते दृश्य पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले. या निषेधाचे छायाचित्र व व्हिडिओ फीत लविव्हचे महापौर अँड्री सदोवी यांनी समाजमाध्यमावर झळकविली आहे. या निषेधप्रसंगी उपस्थित असलेल्या नागरिकांनी आपापली छायाचित्रेही समाजमाध्यमांवर द्यावीत, असे आवाहनही त्यांनी केले आहे. रशियाने लादलेल्या युद्धाची युक्रेनला मोठी किंमत चुकवावी लागत आहे.युक्रेनमधील बालकांचे प्राण वाचविण्यासाठी जगभरातील नागरिकांनी एकजुटीने प्रयत्न करावेत, असे आवाहन अँड्री सदोवी यांनी केले आहे. रशियाला हल्ले करता येऊ नयेत यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने युक्रेनमध्ये हवाई हद्द बंदी (नो-फ्लाय झोन) जाहीर करावी, असे लविव्हचे महापौर अँड्री सदोवी यांनी म्हटले आहे. युक्रेनच्या युद्धामध्ये आतापर्यंत १०९ बालकांचा मृत्यू झाला व १३५ जण जखमी झाले आहेत. हे प्राथमिक स्वरूपाचे आकडे असून, मृत्यू पावलेल्या बालकांची संख्या प्रत्यक्षात कितीतरी अधिक आहे असे युक्रेनमधील प्रशासनाचे मत आहे. युद्धामुळे युक्रेनमध्ये अनेक ठिकाणी झालेल्या विध्वंसाची व जीवितहानीची प्रत्यक्षात पाहणी करणे शक्य झालेले नाही. त्यामुळे किती बालके मृत्युमुखी पडली याचा निश्चित आकडा सांगता येणे अवघड आहे, असेही सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)४९३ शिक्षण संस्थांच्या इमारतींचे मोठे नुकसानरशियाने केलेल्या हल्ल्यांत कीव्ह शहरात ५५, तर खारकीव्हमध्ये ३४ बालकांचा मृत्यू झाला होता.बॉम्ब, क्षेपणास्त्रांचे हल्ले, तसेच तोफांच्या माऱ्यामध्ये युक्रेनमधील ४९३ शिक्षण संस्थांच्या इमारतींचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातील ६३ इमारती पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहेत.रशियाला मदत केल्यास चीनला भोगावे लागतील परिणाम -बायडेनवॉशिंग्टन/बिजिंग : युक्रेनवर आक्रमण करणाऱ्या रशियाला कोणत्याही स्वरूपाची मदत केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा खणखणीत इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी चीनला दिला आहे. बायडेन यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी शुक्रवारी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून युक्रेनसंदर्भात चर्चा केली.रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर या दोन नेत्यांमध्ये पहिल्यांदाच चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी अमेरिका-चीन संबंध, आंतरराष्ट्रीय स्थिती, तसेच रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणामुळे होणारे परिणाम या विषयावर संवाद साधला.व्हाइट हाऊसच्या प्रवक्त्याने सांगितले की, रशियाने युक्रेनवर आक्रमण केले. त्याबद्दल चीनने अद्यापही रशियाचा निषेध केला आहे. रशियाला रोखण्यासाठी, तसेच युद्ध थांबण्यासाठी अमेरिका करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती बायडेन यांनी जिनपिंग यांना दिली. युक्रेनमधील स्थिती आणखी बिघडावी असे आम्हाला वाटत नाही.
Russia vs Ukraine War: ओक्साबोक्शी रडलं तरी आवाजच निघत नाही! 'हा' फोटो पाहून अख्खं जग गहिवरलं
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2022 12:11 PM