कीव: रशिया आणि युक्रेन युद्धाचा आजचा सहावा दिवस आहे. रशियन सैनिक युक्रेनची राजधानी कीवच्या अगदी जवळ पोहोचले आहेत. रशियन फौजांनी कीव, खारकीव आणि चेर्निहाइवमध्ये तोफांचा मारा सुरू केला आहे. रशियन सैन्यानं आक्रमक पवित्रा घेतला आहे. रहिवासी इमारतींनादेखील लक्ष्य करण्यात येत आहे.
रशियाकडून खारकीववर हवाई हल्ले केले जात आहेत. या हल्ल्यामुळे संपूर्ण शहर हादरून गेलं आहे. रशियन सैन्यानं शहरातील सरकारी विभागाचं मुख्यालय क्षेपणास्त्र डागून उद्ध्वस्त केलं. या हल्ल्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. रशियन सैन्यानं केलेला हल्ला काळजाचा थरकाप उडवणारा आहे.
आज सकाळी रशियन सैन्यानं खारकीववर हल्ला चढवला. अनेक सरकारी इमारतींना लक्ष्य करण्यासाठी एअर स्ट्राईक करण्यात आला. खारकीवमधील सरकारी इमारत रशियाच्या हल्ल्यात अवघ्या काही क्षणांत जमीनदोस्त झाली. रशियन सैन्यानं क्षेपणास्त्र डागल्यानंतर धुळीचे लोट पसरले. इमारतीच्या शेजारी असलेली वाहनांचं या हल्ल्यात मोठं नुकसान झालं.