कीव्ह : रशिया युक्रेन युद्धाचा आज एकविसावा दिवस आहे. रशियाकडील शस्त्रसाठा संपत चालला आहे, आणखी जेमतेम १० दिवस युद्ध लढेल असा दावा अमेरिका, ब्रिटनच्या तज्ज्ञांनी केला आहे. अशावेळी रशिया आणि युक्रेनमध्ये चर्चेची चौथी फेरीदेखील संपली आहे. एकीकडे चर्चा सुरु ठेवायची आणि युक्रेनवर जबर हल्ले करायचे ही रणनिती रशियाने आखली होती. परंतू तरीही युक्रेन बधत नसल्याने रशियाच्या पायाखालची वाळू आता सरकू लागली आहे.
चर्चेमध्ये युक्रेनने शरणागती पत्करावी अशी मागणी अनेकदा करण्यात आली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी देखील अनेकदा य़ुक्रेनने शस्त्रे खाली ठेवावीत असे म्हटले आहे. परंतू चौथ्या फेरीतील चर्चेच हा मुद्दाच रशियाने काढला नाही. एवढे क्षेपणास्त्र हल्ले करूनसुद्धा युक्रेन नमत नाही हे आता रशियाच्या लक्षात आले आहे. रशियाने युद्धाचे नियम तोडत नागरिकांच्या इमारती, घरांवर क्षेपणास्त्रे डागली आहेत. यामध्ये अनेक मुलांसह नागरिकांना प्राण गमवावे लागले आहेत.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेंस्की यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने चौथ्या फेरीतील बैठकीची माहिती दिली. डेप्युटी चीफ ऑफ स्टाफ इहोर झोव्कवा यांनी सांगितले की, दोन्ही देशांदरम्यान चर्चा रचनात्मक झाली. रशियाने आपले सूर बदलले असून आत्मसमर्पण करण्याची मागणी बंद केली आहे.
चर्चेच्या सुरुवातीला रशिया या मागणीसाठी (शरणागती) आग्रह धरत होता. परंतू चौथ्या फेरीत त्यांनी अवाक्षरही काढले नाही. यामुळे आता या युद्धावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. शियाने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत एक ठराव सादर केला आहे, ज्यामध्ये युक्रेनमधील धोक्याच्या परिस्थितीत अडकलेल्या नागरिकांची सुरक्षा आणि मानवतावादी मदत आणि देश सोडून जाणाऱ्या लोकांना सुरक्षित मार्गाची मागणी करण्यात आली आहे. मात्र, या ठरावात रशियाने युक्रेनवरील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. एका रशियन राजनयिकाच्या मते, बुधवारी या प्रस्तावावर मतदान होऊ शकते.