Russia vs Ukraine War: ४ लाख लोकांना बळजबरीने रशियात नेले; जेलेन्स्की सरकारचा खळबळजनक आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2022 06:42 AM2022-03-26T06:42:16+5:302022-03-26T06:44:39+5:30
शरण येण्यासाठी दबावतंत्र वापरलं जात असल्याचा युक्रेन सरकारचा दावा
कीव्ह : युक्रेनमधील चार लाखांहून अधिक नागरिकांना पकडून बळजबरीने रशियामध्ये नेण्यात आल्याचा आरोप युक्रेनने केला आहे. त्यामध्ये ८४ हजार मुलांचा समावेश आहे. युक्रेनने शरणागती पत्करावी म्हणून रशिया ही कुटिल कृत्ये करीत असल्याचा दावा युक्रेनच्या जेलेन्स्की सरकारने केला आहे.
युक्रेनच्या दोन फुटीरतावादी प्रांतांच्या स्वातंत्र्याला मान्यता देऊन रशियाने या देशावर २४ फेब्रुवारी रोजी आक्रमण केले. त्यानंतर युक्रेनमधील कीव्ह, लविव्ह, मारियुपोल अशा अनेक शहरांवर रशियाने हल्ले चढविले. युक्रेनला हरप्रकारे नमविण्याचा रशिया प्रयत्न करीत आहेत. युक्रेनच्या काही लाख नागरिकांना बळजबरीने रशियात नेण्यात आल्याच्या आरोपाचा पुतीन सरकारने इन्कार केला आहे. युक्रेनमधील अनेक नागरिकांना रशियामध्ये आश्रय घेण्याची इच्छा होती. म्हणून आम्ही त्यांना येऊ दिले, असे पुतीन सरकारने सांगितले.
रशियाकडूून होणारी इंधन निर्यात युरोप कमी करणार
रशियाकडून इंधन तेल, नैसर्गिक वायू अशा गोष्टींचा युरोपला पुरवठा होत असतो. हे अवलंबित्व कमी करण्याचा निर्णय अमेरिका व युरोपीय समुदायाने घेतला आहे. अमेरिका युरोपला यंदाच्या वर्षी द्रवरूप नैसर्गिक वायूची निर्यात १५ अब्ज क्युबिक मीटरपर्यंत वाढविणार आहे, तसेच भविष्यात या निर्यातीत आणखीही वाढ केली जाण्याची शक्यता आहे. रशियाकडून पाइपलाइनद्वारे युक्रेनमार्गे युरोपला नैसर्गिक वायू व अन्य ऊर्जास्रोतांचा पुरवठा केला जातो.
युक्रेनला युरोपीय समुदायाचे सदस्यत्व देण्याची मागणी
१ युक्रेनला लवकरात लवकर युरोपीय समुदायाचे सदस्यत्व देण्यात यावे, अशी मागणी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की यांनी केली आहे. जेलेन्स्की यांनी सांगितले की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे युरोपच्या दौऱ्यावर आले असून, युक्रेनबाबत पाश्चिमात्य देशांच्या नेत्यांशी चर्चा करीत आहेत.
२युरोपीय समुदायाचे युक्रेनला सदस्यत्व देण्याची हीच योग्य वेळ आहे. युक्रेनला मिळालेली ही एक संधी आहे. हे सदस्यत्व आम्हाला याआधीच मिळाले असते तर रशियाने युक्रेनवर आक्रमण करताना दोनदा विचार केला असता.