Russia vs Ukraine War: अमेरिकेकडून मोठा गेम? युक्रेन पाडले, रशियाला व्हिलन ठरवले, युरोपात अनेक 'गिऱ्हाईक' जोडले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 07:49 PM2022-02-25T19:49:41+5:302022-02-25T19:50:15+5:30
Russia vs Ukraine War: अमेरिकेनं युक्रेनला एकटं पाडलं; बलाढ्य रशियासमोर युक्रेन एकाकी
मॉस्को/ कीव: रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध पेटलं आहे. बलाढ्य रशियासमोर युक्रेनची वाताहत होत आहे. कालपासून सुरू झालेल्या युद्धामुळे युक्रेनचं मोठं नुकसान झालं आहे. अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांनी इशारे देऊन, निर्बंध लादूनही रशिया युद्ध थांबवण्यास तयार नाही. त्यात अमेरिकेसह इतर राष्ट्रांनी रशियाचा निषेध केला असला तरीही युक्रेनच्या मदतीसाठी कोणीही सैन्य पाठवलेलं नाही. त्यामुळे युक्रेन एकाकी पडला आहे.
बलाढ्य रशियासमोर युक्रेनचा निभाव लागणार नाही याची कल्पना सगळ्यांना आहे. युक्रेननं नाटोचा सदस्य होऊ नये म्हणून रशियानं हल्ला चढवला. अमेरिकेनं आपण युक्रेनच्या पाठिशी असल्याचं जाहीर केलं. रशियाचा निषेध केला. मात्र व्यापारी निर्बंध लादण्याव्यतिरिक्त काहीच केलं नाही. अमेरिकेनं युक्रेनच्या मदतीला सैन्य पाठवलं नाही. त्यामुळे अमेरिकेनं ठरवून युक्रेनला बळीचा बकरा बनवलं का, अशी चर्चा जोर धरू लागली आहे.
तेल आणि वायूच्या व्यापारासाठी अमेरिकेनं युक्रेनला वापरून घेतल्याचं बोललं जात आहे. 'रशियानं थोडी जमीन धेतल्यास अमेरिकेला फरक पडणार नाही, असं अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन दोन महिन्यांपूर्वी म्हणाले होते,' याची आठवण माजी राजदूत राजीव डोगरा यांनी करून दिली. अमेरिकेनं आधी रशियाला चिथावणी दिली. तुम्ही हल्ला करा, पण कीवपर्यंत जाऊ नका, असा बायडन यांच्या विधानाचा अर्थ होता, असं डोगरा यांनी सांगितलं.
अमेरिकेत मोठ्या प्रमाणात तेल आणि वायूचे साठे आहेत. युरोपियन देशांनी आपल्याकडून तेल आणि नैसर्गिक वायू खरेदी करावा, असं अमेरिकेला वाटतं. मात्र वाहतुकीसाठी येणाऱ्या खर्चामुळे जर्मनीला इंधन महाग पडतं. रशिया नॉर्ड स्ट्रीम २ वर काम करत आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर जर्मनीसह युरोपीय देशांना मोठा फायदा होईल. वाहतूक खर्च कमी होईल. त्यामुळे तेल आणि वायू स्वस्तात मिळेल. तसं झाल्यास अमेरिकेच्या तेल आणि वायूला ग्राहक मिळणार नाहीत. म्हणून अमेरिकेनं जाणूनबुजून रशियाला युद्धासाठी चिथावलं आणि युरोपीय देशांना रशियाविरोधात भडकावलं, असं तज्ज्ञ सांगतात.