कीव्ह: रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये युद्ध सुरू होऊन दीड आठवडा उलटला आहे. युक्रेनमधून आतापर्यंत पंधरा हजारहून अधिक भारतीय मायदेशी परतले आहेत. तर अद्यापही शेकडो भारतीय तिथे अडकले आहेत. काही भारतीय विद्यार्थ्यांनी त्यांच्या पाळीव प्राण्यांशिवाय देश सोडण्यास नकार दिला. या विद्यार्थ्यांना त्यांच्या श्वानांसह, मांजरींसह भारतात येण्याची परवानगी सरकारनं दिली. मात्र एका भारतीय डॉक्टरला वेगळीच समस्या जाणवत आहे.
मूळचे आंध्र प्रदेशचे असलेले डॉ. कुमार बंदी कीव्हपासून ८५० किमी अंतरावर असलेल्या डोनबासमध्ये वास्तव्यास आहेत. बंदी यांनी त्यांच्या घरातील बंकरमध्ये आश्रय घेतला आहे. आपल्या पाळीव प्राण्यांची काळजी असल्यानं त्यांनी भारतात येण्यास नकार दिला आहे. बंदी यांच्याकडे एक बिबट्या आणि एक ब्लॅक पँथर आहे.
डॉ. कुमार पेशानं यूट्यूबर आहेत. बिबट्या आणि ब्लॅक पँथरला घेऊन फिरत असतानाचे व्हिडीओ ते अनेकदा अपलोड करतात. माझ्या पाळीव प्राण्यांची काळजी घेणारं इथे कोणीच नाही. त्यामुळे मला युक्रेन सोडायचा नाहीए, असं कुमार म्हणाले. आपल्याकडे असलेली जॅग्वार प्रजाती जगातील सर्वात दुर्मीळ प्रजाती असल्याचा त्यांचा दावा आहे.
कुमार १५ वर्षांपूर्वी एमबीबीएस करण्यासाठी युक्रेनला गेले. त्यानंतर ते तिथेच स्थायिक झाले. त्यांनी चार तेलुगु चित्रपटात काम केलं आहे. हे चित्रपट अद्याप प्रदर्शित झालेले नाहीत. तेलुगु, तमिळ आणि मल्याळी मालिकांमध्ये ते पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसले आहेत. त्यांनी युक्रेनमध्येही काही चित्रपटांत अभिनय केला आहे.