कीव्ह: रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये युद्धाला तोंड फुटून दीड महिना होत आला आहे. अद्याप युद्ध पूर्णपणे संपलेलं नाही. मात्र रशियन फौजांनी माघार घेण्यास सुरुवात केली आहे. बलाढ्य रशियन लष्करासमोर युक्रेनचा फार दिवस निभाव लागणार नाही असा अनेकांचा अंदाज होता. मात्र युक्रेनच्या सैनिकांनी कडवी झुंज दिली. या युद्धात रशियन फौजांचं प्रचंड मोठं नुकसान झालं. युद्ध लांबल्याचा परिणाम रशियन सैनिकांच्या मनोधैर्यावर झाला.
युक्रेनी सैन्यानं रशियाचं एक हेलिकॉप्टर पाडलं आहे. रशियन हेलिकॉप्टर पाडण्यासाठी युक्रेनी सैन्यानं स्टार्सस्ट्रीक क्षेपणास्त्राचा वापर केला. स्टार्सस्ट्रीक हवेत मारा करणारं क्षेपणास्त्र आहे. ब्रिटनमध्ये या क्षेपणास्त्राची निर्मिती झाली आहे. पोर्टेबल असलेलं हे क्षेपणास्त्र अतिशय वेगवान आहे. पूर्व युक्रेनमध्ये असलेल्या लुहान्स्क प्रांतात या क्षेपणास्त्राचा वापर झाला. या क्षेपणास्त्रानं रशियाच्या हेलिकॉप्टरचे हवेत दोन तुकडे केले.
ब्रिटननं स्टार्सस्ट्रीक क्षेपणास्त्र विकसित केलं आहे. ब्रिटनकडे असणाऱ्या या अत्याधुनिक क्षेपणास्त्राचा प्रथमच युद्धभूमीवर वापर झाला आहे. या क्षेपणास्त्रानं रशियाच्या एमआय-२८ एन हेलिकॉप्टरचं शेपूट उडवलं. जवळपास आठवडाभर युक्रेनी सैन्य या क्षेपणास्त्राचा वापर करत आहे.
दीड महिन्यापासून लढत असलेल्या रशियन सैन्यानं युक्रेनची राजधानी कीव्हसह उत्तर युक्रेनमधून माघार घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र त्यांच्याकडून सातत्यानं गोळीबार सुरू आहे. रशियन सैन्य माघार घेत असताना अनेक ठिकाणी सुरुंग पेरत आहे. रशियन सैनिकांच्या, युक्रेनी नागरिकांच्या मृतदेहांजवळ, लोकांच्या घरांमध्ये सुरुंग पेरुन रशियन फौजा माघारी जात आहेत. या सुरुंगामुळेही युक्रेन सैन्याची हानी होत आहे.