Russia vs Ukraine War: धक्कादायक! युक्रेनमध्ये चर्चेसाठी गेलेल्या रशियन अब्जाधीशावर विषप्रयोग; कटामागे नेमकं कोण?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 07:50 AM2022-03-29T07:50:56+5:302022-03-29T07:51:15+5:30
Russia vs Ukraine War: युक्रेनमध्ये चर्चेसाठी गेलेल्या रशियन उद्योगपतीवर विषप्रयोग; दिसू लागली विचित्र लक्षणं
कीव्ह: युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये पेटलेलं युद्ध महिन्याभरानंतरही सुरूच आहे. आतापर्यंत अनेकदा दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली. मात्र त्यातून तोडगा निघाला नाही. यानंतर आता युक्रेनमध्ये वेगळ्याच घटना घडू लागल्या आहेत. युरोपमधील प्रसिद्ध फुटबॉल क्लब चेल्सीचे मालक रोमन अब्रामोविच मार्चच्या सुरुवातीला युक्रेनमध्ये चर्चेसाठी गेले होते. शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी युक्रेनमध्ये गेलेल्या शिष्टमंडळाचा ते भाग होते. या दौऱ्यादरम्यान त्यांच्यावर आणि त्यांच्यासोबत असलेल्या काही जणांवर विष हल्ला झाला.
अब्रामोविच रशियन नागरिक आहेत. यांच्यासह तिघांमध्ये अजब लक्षणं दिसून आली. त्यांना अंगदुखीचा त्रास जाणवू लागला. डोळे लाल झाले. हाताची त्वचा निघून जाऊ लागली. वॉल स्ट्रिट जर्नलनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. ३ मार्चला रोमन अब्रामोविच यांच्यासह तिघांना बैठकीनंतर विष देण्यात आलं. रशिया आणि युक्रेन यांच्यातलं युद्ध थांबावं. शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी अब्रामोविच प्रयत्नशील होते.
बैठकीला अब्रामोविच यांच्यासह आणखी एक रशियन उद्योगपती आणि युक्रेनचे खासदार उमेरोव उपस्थित होते. रात्री १० पर्यंत बैठक सुरू होती. त्यानंतर त्यांच्या शरीरात काही लक्षणं दिसू लागली. रासायनिक हत्यारांच्या माध्यमातून विष दिल्यानंतर दिसणारी लक्षणं त्यांना जाणवू लागली.
बैठकीत सहभागी झालेल्या तिघांनी मॉस्कोतील कट्टरतावाद्यांवर केमिकल हल्ल्याचा आरोप केला. युक्रेनविरुद्ध सुरू असलेलं युद्ध थांबावं असं रशियातल्या कट्टरतावाद्यांना वाटत नाही. त्यामुळेच शांततेसाठी सुरू असलेला संवाद अयशस्वी करण्याचा प्रयत्न या गटानं केला.