Russia vs Ukraine War: झुकेंगे नहीं! मृत्यू समोर होता, पण शरणागती पत्करली नाही; १३ युक्रेनी सैनिकांनी मरण कवटाळलं
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 03:49 PM2022-02-25T15:49:33+5:302022-02-25T15:49:49+5:30
Russia vs Ukraine War: रशियन सैन्यासमोर गुडघे टेकण्यास १३ सैनिकांचा स्पष्ट नकार; बेटावर कब्जा करून रशियन सैनिकांनी १३ जणांची केली हत्या
मॉस्को: रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध पेटलं आहे. बलाढ्य रशियासमोर युक्रेनची वाताहत होत आहे. या दरम्यान एक हृदयस्पर्शी घटना घडली आहे. युक्रेनच्या स्नेक आयलँडवर तैनात असलेल्या सैनिकांना जीव गमवावा लागला आहे. रशियन युद्धनौकेवर असलेल्या सैनिकांनी बेटावरील १३ युक्रेनी सैनिकांना शरणागती पत्करण्यास सांगली. मात्र त्या सैनिकांनी शरण येण्यास नकार दिला. यानंतर रशियन सैन्यानं त्यांची हत्या केली. युक्रेन सरकारनं या शहीद जवानांचा हिरो ऑफ युक्रेन खिताबानं सन्मान केला आहे.
काळ्या समुद्रात स्नेक आयलँड आहे. रशियनं युद्धनौका या बेटाजवळ पोहोचली. नौकेवरील सैन्यानं हल्ल्याची धमकी दिली. शरण या अन्यथा हल्ला करू, असा इशारा देण्यात आला. बेटावर तैनात असलेल्या बॉर्डर गार्ड्सनी रशियन आव्हानांना थेट आव्हान दिलं. गुडघे टेकणार नाही म्हणत गार्ड्स यांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्यानंतर रशियन सैनिकांनी त्यांचा खात्मा केला.
रशियन नौदलानं Moskva आणि Vasily Bykov युद्धनौकला बेटाच्या दिशेनं पाठवलं होतं. नौकेवरील सैनिकांनी प्रथम बंदुका दाखवत बेटावरील जवानांना घाबरण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर रशियन सैनिक बेटावर उतरले. त्यांनी बेट ताब्यात घेतलं. रशियानं बेट ताब्यात घेतल्याची माहिती युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयानं ट्विट करून दिली. तिथे तैनात असलेल्या १३ बॉर्डर गार्ड्सना जीवे मारण्यात आलं. त्यांनी शरण येण्यास नकार दिला होता.
रशियानं काल युक्रेनवर हल्ला केला. आज सकाळी रशियानं युक्रेनची राजधानी कीववर आक्रमण करण्यास सुरुवात केली. कीववर सहा क्षेपणास्त्र डागण्यात आली. यानंतर रशियन सैन्य कीवपर्यंत पोहोचलं. राजधानीच्या बाहेर युक्रेन सैन्य रशियाचा मुकाबला करत आहे. रशियाला रोखण्यासाठी युक्रेनी सैन्यानं एक पूल उद्ध्वस्त केला आहे. रशियाच्या हल्ल्यात १३७ नागरिकांचा मृत्यू झाला असून ३१६ जखमी झाल्याचं युक्रेनकडून सांगण्यात आलं आहे.